Uncategorizedपर्यटन

पुरंदर किल्ला

2.57Kviews

पुरंदर किल्ला–
पुरंदर किल्ल्याची उंची १५०० मीटर असुन हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात मोडतो.
सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा तसाच पूर्वेकडे अदमासे २४ कि.मी. धावून भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर, वज्रगडा वसलेला आहे.


अल्याड जेजुरी पल्याड सोनोरी मध्ये वाहते कऱ्हा पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा । असे पुरंदर किल्ल्याचे वर्णन केलेले आढळते. पुरंदरच्या पायथ्याशी नारायणपूर नावाचे गाव आहे. या गावात यादवकालीन धाटणीचे महादेवाचे मंदिर आहे. यावरून हा किल्ला साधारण १००० ते १२०० वर्षांपूर्वीचा आहे असे अनुमान निघते.
बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकण्ठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेंदऱ्या बुरूज बांधताना तो सारखा ढासळत असे. तेव्हा बहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला.
हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहंमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावामधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेशा करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजी राजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १६ ने १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगरसोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत.
बिनी दरवाजा :
पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा. आपण नारायणपूर गावातून किल्ल्यावर जातांना हा दरवाजा लागतो. दरवाजा आजही चांगल्या स्थितीत आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच पुरंदरचा खंदकडा आपले लक्ष वेधून घेतो. बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते त्याचे नाव ‘पुरंदरेश्वर’.
रामेश्वर मंदिर :
पुरंदरेश्वर मंदिराच्या मागील कोपऱ्यात पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते. या मंदिराच्या थोडे वरती गेल्यावर पेशव्यांच्या दुमजली वाड्यांचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथाने तो बांधला. या वाड्यातच सवाई माधवरावांचा जन्म झाला. वाड्याच्या मागे विहीर आहे. आजही ती चांगल्या अवस्थेत आहे.
खंदकडा :
या तीसऱ्या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट गेलेला दिसतो हाच तो खंदकडा. या कड्याच्या शेवटी एक बुरूज आहे. येथेच अंबरखाना असल्याचे अवशेष दिसतात. खाली गेल्यावर केदार दरवाजा लागतो. पडझडी मुळे आज हा दरवाजा वापरात नसला तरी पूर्वी या दरवाजाला फार महत्त्व होते.
पद्मावती तळे : मुरारबाजींच्या पुतळ्या पासून थोडे पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते.
शेंदर्‍या बुरूज :
पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधला आहे त्याचे नाव शेंदऱ्या बुरूज.


पुरंदरेश्वर मंदिर :
हे मंदिर महादेवाचे आहे. मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फूटापर्यंतची मूर्ती आहे. हे मंदिर साधारणपणे हेमाडपंथी धाटणीचे असावे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
दिल्ली दरवाजा :
हा उत्तारभिमुख दरवाजा आहे. दरवाज्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. दरवाजा बऱ्यांपैकी सुस्थितीत आहे.
केदारेश्वर :
पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक याच्या दर्शनाला येतात. मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळा आहे. सभोवती दगडी फरसबंदी आहे. केदारेश्वराचे मंदिर म्हणजे किल्ल्यावरील अत्युच्च भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, रोहीडा, मल्हारगड, कऱ्हे पठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे त्याला कोकण्या बुरूज असे नाव आहे.
पुरंदरची माची :

भैरवखिंड :
खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिंडीपर्यंत गाडी रस्ता आलेला असल्याने त्या रस्त्यावरून चालत गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो. सध्या पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते.
वीर मुरारबाजी :
बिनीदरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे गेल्यावर समोरच वीर मुरारबाजीचा पुतळा दिसतो. इ.स. १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे.

Leave a Response