शेती

माती परीक्षणाचे फायदे

46views

माती परीक्षणाचे फायदे

मातीचा नमुना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी (सेंद्रिय, रासायनिक खते देण्यापूर्वी) व खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी द्यावा.

मातीचा रंग, जमिनीचा खडकाळपणा, उंच-सखलपणा, पिकातील फरक व बागायत किंवा जिरायत स्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे शेतीचे 1 ते 2 हेक्टरचे वेगवेगळे भाग पाडावेत व त्या प्रत्येक भागाला विशिष्ट क्रमांक द्यावेत. वरील भाग दोन हेक्टरपेक्षा मोठा असल्यास त्याचे सारखे भाग करावेत. फारच लहान भाग पाडू नयेत.
निवडलेल्या शेताच्या मध्य रेषेच्या दोन्ही बाजूस 5 ते 6 वळणे असलेल्या दोन नागमोडी रेषा काढून त्या प्रत्येक वळणावर खुणेसाठी फांदी अगर दगड रोवावा.

त्या प्रत्येक खुणेभोवती इंग्रजी “व्ही’ आकाराचा 20सें.मी. खोलीचा खड्डा घेऊन खड्ड्यातील माती बाहेर फेकून खड्डा मोकळा करावा. खड्ड्याच्या सर्व बाजूंनी सारख्या जाडीची माती वरपासून खालपर्यंत तासावी व ती स्वच्छ घमेल्यात गोळा करून गोणपाटावर ठेवावी. अशा तऱ्हेने प्रत्येक खुणेभोवती खड्डे घेऊन एका शेतातून गोळा झालेली माती एकत्र चांगली मिसळावी.

नंतर तिचे सारखे चार भाग करावेत. समोरासमोरचे दोन भाग वगळून उरलेले दोन भाग पुन्हा एकत्र मिसळून त्याचे चार भाग करावेत. पुन्हा समोरासमोरचे दोन भाग वगळावे, अशा तऱ्हेने शेवटी दोन ओंजळी किंवा अर्धा किलो माती शिल्लक असेपर्यंत करावे. वरील माती बारीक करावी व ओली असल्यास सावलीत वाळवावी.

विशेष मृद नमुना –
जमिनीचा रंग, जमिनीचा खडकाळपणा, उंच-सखलपणा याप्रमाणे सारख्या गुणधर्मासाठी 1 ते 2 हेक्टर क्षेत्राचे भाग पाडून त्याच्या मध्यभागी जास्तीत जास्त तीन फूट अथवा कठीण मुरूम अथवा खडकापर्यंत खड्डा घ्यावा. प्रत्येक 1 फूट खोलीसाठी वेगळा नमुना घ्यावा म्हणजेच एक फूट खोलीचा एक थर घ्यावा. यासाठी 1 फूट खड्डा पूर्ण झाल्यावर खड्ड्याच्या चार बाजूंची माती तासून खड्ड्यामध्ये टाकावी.

ती चांगली एकत्र मिसळावी व त्यातील अर्धा ते पाऊण किलो माती तपासणीसाठी घ्यावी. दुसऱ्या थरातील खोलीसाठी वरील 1 फूट सोडून त्यापासून खाली 1 फूट खोलीपर्यंत चार बाजूंनी माती खड्ड्यात पाडावी व चांगली एकत्र करून त्यातील माती अर्धा ते पाऊण किलो माती तपासणीस घ्यावी. तिसऱ्या थरासाठी खड्ड्याच्या तळापर्यंत (2-3 फूट खोलीपर्यंत) अथवा मुरूम लागला असेल त्या खोलीपर्यंतच्या थरातील माती चारी बाजूंनी खड्ड्यात पाडावी व त्यातील नमुना वरीलप्रमाणे घ्यावा.

सूक्ष्म मूलद्रव्य नमुना –
सूक्ष्म मूलद्रव्य तपासणीसाठी मातीचा नमुना काढण्यासाठी पद्धत सर्वसाधारण माती नमुना काढण्यासाठीच्या पद्धतीसारखीच आहे. खड्डे घेण्यासाठी टिकाव, कुदळ, खोरे इ. लोखंडी हत्यारांचा वापर करावा लागतो. लोखंडी हत्यारे जमिनीस घासल्यामुळे त्याचा सूक्ष्म अंश माती नमुन्यामध्ये येण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी खड्डा पूर्ण झाल्यावर लाकडी पट्टीच्या साह्याने खड्डा वरपासून खालपर्यंत तासावा व त्यातील माती पूर्णपणे हातांनी काढून टाकावी. लाकडी पट्टीच्या साह्याने खड्डा पुन्हा वरपासून खालपर्यंत तासावा व ती माती प्लॅस्टिक घमेले अथवा गोणपाटावर घ्यावी. अशा पद्धतीने 6-7 ठिकाणी खड्डे घेऊन त्यातील माती एकत्रित करून अर्धा ते पाऊण किलो माती नमुना सूक्ष्म मूलद्रव्य तपासणीसाठी घ्यावा.

मातीचा नमुना घेण्यासाठी खड्ड्याची खोली –
हंगामी पिकांसाठी 20 सें.मी. (वितभर), ऊस, कापसासाठी 30 सें.मी. (फूटभर) आणि फळ बागायती पिकांसाठी 100 सें.मी. किंवा मातीच्या खोलीपर्यंत फळबाग पिकाकरिता खोदलेल्या खड्ड्यातील साधारणपणे प्रत्येकी 30 सें.मी. खोलीचा वेगवेगळा नमुना घ्यावा.

मातीचा नमुना पाठवणे –
पुढील पिकाच्या दोन ते तीन महिने अगोदर वरीलप्रमाणे नमुने घेऊन संपूर्ण माहितीसह आपल्या भागातील कृषी सहायक किंवा आपल्या जिल्ह्याशी संलग्न असलेल्या प्रयोगशाळेकडे पाठवावेत.

Leave a Response