इतिहासपर्यटन

राजगड किल्ला

667views

राजगड किल्ला –


१३९४ मीटर उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
तीन दिशांना पसरत गेलेल्या तीन माच्या आणि मधोमध बालेकिल्ल्याची सोंगटी अशी या किल्ल्याचि रचना आहे. पद्मावती माचीवरील पद्मावतीच्या मंदिरात, दारुकोठारात आणि नुकत्याच बांधलेल्या वास्तूत निवाऱ्याची सोय होऊ शकते. पद्मावती माचीवरील राजसदर, संजीवनी माचीवरील चिखलताचे बांधकाम, सुवेळा माचीवरील नेढे आणि घसरगुंडीचा अनुभव मिळवून देणारा डुबा हे सर्व बघण्यास विसरु नका आणि या सर्वांचा शिरोमणी म्हणजे बालेकिल्ला!
राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती, म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. शिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्ग राज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो.

इतिहास : राजगडा संबंधीचे उल्लेख

१) ‘राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले अभेद्य स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसले आहेत की मावळ्यांचा नेता शिवाजी याला राज्यविस्तारासाठी किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला’
-जेम्स डग्लस ( बुक ऑफ बॉम्बे)

२) साकी मुस्तैदखान त्याच्या मासिरे आलिमगिरे नावाच्या ग्रंथात म्हण्तो -‘राजगड हा अतिशय उंच. त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल. त्याचा घेर १२ कोसांचा आहे. त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती. डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते. इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही.’
३) महेमद हाशिम खालीखान याने ‘मुन्तखबुललुबाब-ए-महेमदॉशाही’ नामक ग्रंथामध्ये म्हणतो, ‘राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु? काय त्या किल्ल्याची उंची, काय त्यांचा विस्तार ! जणू काही आकाशच पसरले होते त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस्त्र पशु दिसत. त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांग त्याचा घेर बारा कोसांचा त्याला सगळीकडून वेढा घालणे कठिण होते.’
राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरंबदेव हा किल्ला बह्मनी राजवटी मध्ये याच नावाने ओळखला जात असे अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते. इसवी सन १४९० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट आणि तळको कणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केले आणि याच वेळी त्याने मुरूंबदेव हा किल्ला हस्तगत केला. मुरुमदेवचे गडकरी बिनाशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयास करावे लागले नाही. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर १२५ वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही. इसवी सन १६२५ च्या सुमारास मुरूमदेव किल्ला निजामशाही कडून आदिलशाही कडे आला. निजामशहाच्या वतीने बाजी हैबतराव शिलीमकर व त्याचे वडील रुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहत होते. मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबरावाने मुरुमदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखामाकडे दिला.

सन १६४६ ते १६४७ च्या सुमारास शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत हा किल्ला जिंकून घेतला. हा किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठ्या सुरु केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या त्यास ही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. शिरवळ नजीक खेडबारे नावाचा गाव होता तेथे रान फार होते त्या ठिकाणी फर्माशी आंब्याची झाडे लावून पेठ वसविली व तिचे नाव शिवापूर असे ठेवले. इसवीन्सन १६६० मध्ये औरंगजेवाच्या आज्ञेनुसार शाहिस्तखानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठविले होती ह्या फौजने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उध्वस्त केली परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिकंण्याचा प्रयत्न मात्र केला नाही ६ एप्रिल १६६३ रोजी शाहीस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले.

२४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसुरे यास राजगडावरुनच १६७० मध्ये पाठविले. सन १६७१-१६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड स्थान राजधानी साठी निश्चित केले आणि राजधानी रायगडावरुन राजगडाकडे हलविली.
३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचे निधन झाल्यावर स्वराज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले. ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांना पकडून ठार मारले यानंतर मुगलानी मराठ्यांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोरसिंह हाडा या मुगल सरदाराने जून १६८९ मध्ये राजगड जिंकून घेतला. औरंगजेबाने अबुलखैरखान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले. मात्र अद्याप संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरली नव्हती त्यामुळे मराठ्यांची फौज राजगडाभोवती गोळा झाली आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला.


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
पद्मावती तलाव :
रामेश्वराचे मंदिर :पद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वभिमुख असे रामेश्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात असणारी मारूतिरायांची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.
राजवाडा :
सदर :पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे.
पाली दरवाजा :पाली दरवाजचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फाआ प्रशस्त असून चढण्यासाठी पायऱ्या खोदल्या आहेत. पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे. यातून हत्ती सुद्धा अंबरीसह आत येऊ शकतो. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना ‘फलिका’ असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. द
गुंजवणे दरवाजा :गुंजवण दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची एक मालिक आहे.

पद्मावती माची :राजगडाला एकूण ३ माच्या आहेत. या पैंकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे मंदिर, सईबाईंची समाधी, हवालदारांचा वाडा, रत्नशाला, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही शिल्लक आहेत.

पद्मावती मंदिर :सध्या २००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे. शिवरायांनी किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले याचा उल्लेख आढळतो. सध्या मंदिरात आपल्याल तीन मूर्त्या दिसतात.

संजीवणी माची :सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली. माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत.

आळु दरवाजा :तोरणा वरुन राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाजातून जात असे.

सुवेळा माची :मुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनी एवढी लांब नाही मात्र या माचीचे सुद्धा ३ टप्पे आहेत.

काळेश्वरी बुरुज आणि परिसर :सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्प्याकडे जाणाऱ्या वाटेच्या उजवीकडे वळल्याव्र आपल्याला पाण्याची काही टाकी दिसतात. पुढे रामेश्वर मंदिराचे काही अवशेष आहेत. या रामेश्वर मंदिरात शिवलिंग, भग्न नंदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पे आढळतात. गडावरुन तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.

गडावर जाण्याच्या वाटा : गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत.
१. गुप्तदरवाज्याने राजगड : पुणे-राजगड अशि एस.टी. पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते बाबुदा झापा पासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत. यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते. यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.
२. पाली दरवाज्याने राजगड : पुणे-वेल्हे एस.टी. ने वेल्हे मार्गे पाबे या गावी उतरुन कानद नदी पार करुन पाली दरवाजा गाठावा. ही वाट पायऱ्यांची असून सर्वात सोपी आहे. यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.
३. गुंजवणे दरवाज्याने राजगड : पुणे वेल्हे या हमरस्त्यावरील मार्गासनी या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते. ही वाट अवघड आहे. या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात. माहितगारा शिवाय या वाटेचा उपयोग करु नये.
४. अळु दरवाज्याने राजगड : भुतोंडे मार्गे आळु दरवाज्याने राजगड गाठता येतो. शिवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो.
५. गुप्तदरवाजामार्गे सुवेळा माची.

Leave a Response