पर्यटन

रायगड किल्ला

1.95Kviews

रायगड माहिती:-

महाराष्ट्राचा इतिहासात रायगड किल्ल्याला महत्वाचे
स्थान आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगातील हा किल्ला
अतिशय प्रेक्षणीय आहे. महाराष्ट्रातील रायगड
जिल्ह्यातील महाडपासून सुमारे पंचवीस किलोमीटर
अंतरावर हा किल्ला असून त्याची समुद्रसपाटीपासून
उंची सुमारे २८५१ फूट आहे.

रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते .जावळीचा प्रमुख यशवंतराव मोरे हा जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला.छत्रपति शिवरायांनी,६ एप्रिल १६५६ रोजी रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायगड शिवरायांच्या ताब्यात आला.कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद याच्याकडून लुटलेल्या खजिन्याचा वापर गडाच्या बांधकामासाठी केला.रायगडाची जागा अवघड ठिकाणी असल्यामुळे तसेच ते सागरी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे छत्रपति शिवरायांनी रायगडाची राजधानी म्हणून निवड केली.

सभासद बखरीमध्ये रायगडाबद्दल पुढीलप्रमाणे वर्णन आहे,‘राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा’

दिनांक ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी रायगडावर राजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. ता. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी अश्विन शु. ५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी राजांनी स्वतःचा तांत्रिक पद्धतीने आणखी एक राज्याभिषेक करून घेतला.

शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु.७, इ.स.१६८१ १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.तर शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु. ३, १२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक झाला.दि.३ नोव्हेंबर १६८९ रोजी सुर्याजी पिसाळ या फितूर किल्लेदारामुळे हा किल्ला मोगलांना मिळाला.दिंनाक ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठ्यांनी घेतला.पुढे इंग्रजांनी पेशव्यांच्या ताब्यातून गड कब्जात घेतल्यानंतर लुटून,आग लावून किल्ल्याची नासधूस केली,त्यामुळे आज किल्ला पडझडीच्या अवस्थेत उभा आहे.

हिरोजी इंदुलकर यांनी आपले संपूर्ण कौशल्य पणाला
लावून हा किल्ला बांधला आहे. या किल्ल्यावर
राजसभा, राजनिवास, न्यायसभा, कल्याणसभा, विवेक
सभा, दारु कोठारे, अंबरखाने, मंत्र्यांची निवासस्थाने,
कचेच्या, नगरपेठ, किर्तीस्तंभ, तलाव, मंदिरे,
खलबतखाना, हत्तीशाळा, अश्वशाळा, वस्त्रागार,
रत्नागार, जगदीश्वर प्रासाद, करमणुकीची स्थाने अशी
अनेक बांधकामे केली गेली होती. तसेच संरक्षण दृष्टीने
डोंगराचे कडे तासलेले आहेत, भक्कम तटबंदी आणि
बुलंद बुरुज उभारले गेले होते. तसेच अनेक चोरवाटाही
बनविल्या गेल्या होत्या. गडाला जवळपास १४५
पायच्या आहेत. गड चढायला सुरुवात केल्यावर
उजव्या बाजूस खुबलढा बुरुज आहे जिथून पायथ्याच्या
खिंडीवर नजर ठेवली जात असे.
बुरुजाशेजारी ‘चित् दरवाजा’ होता परंतु आता तो
उध्वस्त झाला आहे. चित्दरवाज्याने नागमोडी रस्त्याने
पुढे गेल्यावर दोन पडक्या इमारती दिसतात ज्यातील
एक सैनिकांची जागा व दुसरी धान्याचे कोठार होते. पुढे
मदनशहाचे थडगे आहे जे मशीदमोर्चा म्हणून ओळखले
जाते आणि एक मोठी तोफसुद्धा आहे. शिवाय थोड्या
अंतरावर खडकात खोदलेल्या तीन गुहाही आहेत.

Leave a Response