ब्लॉग मनोरंजन महाराष्ट्र मुंबई यशोगाथा

पानपट्टीची टपरी टाकण्यापासून ते सुप्रसिद्ध विनोदवीर होण्यापर्यंतचा प्रवास सहजसोप्पा कधीच नव्हता…

हिंदी सिनेसृष्टी मध्ये कॉमेडीला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले ते कॉमेडी चित्रपटांनी….. तेथे कलाकारांना कॉमेडियन म्हणून हिणवले जाते. हिंदी मध्ये कॉमेडियन हा सुपरस्टार किंवा स्टार ही मानला जातो कि नाही हे अलाहिदा ! पण याच्या उलट मराठी सिनेसृष्टी मध्ये कॉमेडीचा आणि कॉमेडियन चा दर्जा कितीतरी पटीने उच्च आहे. ह्या सगळ्यात मोलाचा वाट आहे तो आपल्या मराठी कलाकारांचा ज्यांनी कॉमेडी या विषयाला एका उंचीवर न्हेऊन ठेवले आहे. कोणत्याही वाईट दर्जाची कॉमेडी न करता अर्थपूर्ण कॉमेडी नेहमीच आपले कलाकार देण्याचा प्रयत्न करतात. आपल्या सगळ्या कलेच्या निष्ठेच्या जोरावर आज अनेक कलाकार कितीही वाईट परिस्थिती आली असली तरी कलेला देव मानून काम करतात. वर्तमानात मराठी सिनेसृष्टीतल असचं एक लाखमोलाच नाव म्हणजे ‘भाऊ कदम’ !

‘भाऊ कदम’ या नावाला आज अख्खा महाराष्ट्र ओळखतो. संपूर्ण महाराष्ट्रात हे नाव कुणाला माहित नाही असे क्वचितच कोणीतरी सापडेल. पण ही आजची परिस्थिती आधी अशी नव्हती. भाऊ आज ज्या ठिकाणी यशस्वी उभे आहेत तिथे पोहचायला त्यांनी आयुष्यात बऱ्याच संकटांना तोंड दिले आहे. या यशामागे अडचणींचा, कष्टाचा, मेहनतीचा भला मोठा डोंगर आहे. भाऊंनी तो हसत हसत आणि लोकांना ही हसवत पार केला. भाऊंच्या साध्या भोळ्या आणि सदैव हसऱ्या चेहऱ्यामागे कितीतरी दुःख, कष्ट नेहमी लपलेली असायची पण त्यांनी ती कधीही कोणाला जाणवू दिली नाहीत. ना कधी प्रेक्षकांना, ना कधी आपल्या सहकलाकारांना सुधा आपल्या परिस्थितीचा अंदाज लागू दिला नाही.

करियर च्या सुरुवातीला भाऊंनी खूप स्ट्रगल केले.
वड्याळाच्या चाळीत राहुन वडिलांच्या अकाली निधनानंतर अर्थार्जनासाठी त्यांनी मतदार नोंदणीचे काम सुरू केले व त्यानंतर भावाबरोबर पानाचं दुकान सुरु केलं. काही व्यक्तिगत परिस्थिती मुळे त्यांना बीपीटी चाळीतील आपले घर सोडले डोंबिवलीत स्थायिक व्हावे लागले. पण तेव्हाचा काळ देखील कठीण होता. वडाळा आणि डोंबिवली यात जमीन आकाशाचे अंतर आहे.सुध्दा अभिनयाची आवड असणाऱ्या भाऊंनी ५००हून अधिक नाटकात काम केले आहे. डोंबिवलीत येऊन राहणे काही तितकेसे सोप्पे नव्हते पण तरीही तेथे तडजोड करून त्यांनी आपल्या संसाराची गाडी रुळावर आणली.

बऱ्याच सिनेमात, सिरीयल मध्ये छोटी मोठी कामे केली पण त्यांना हवं तस यश काही त्यांच्या पदरी पडल नाही. पडद्यावर कितीही कमी वेळेची भूमिका असली तरीही कुठला ही कमीपणा न वाटून घेता ते काम करतच राहिले. ते कधीही परिस्थिती पुढे हरले नाहीत की कधी थांबले नाहीत. टाईमपास मधल्या दगडूच्या बापाची भूमिका असू देत किंवा सायकल मधल्या चोराची, अशा छोट्याशा भूमिकेतही भाऊंनी आपण उत्तम कलाकार आहोत हे नेहमीच सिद्ध केलं.

या सगळया स्ट्रगलच्या काळात त्यांना खरा हात दिला तो ‘चला हवा येऊ द्या’ या महाराष्ट्राच्या सर्वात लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाने… महाराष्ट्रामध्ये तर चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम बरेच लोक फक्त भाऊंना पाहण्यासाठी बघतात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. काही ठिकाणी तर हा कार्यक्रम भाऊ कदम यांचा कार्यक्रम या नावानेच प्रसिध्द आहे. बेदरकार विनोदबुध्दी, लोकांना खुळवून ठेवण्याची सचोटी, विनोदाच योग्य टाईमिंग, आणि महत्वाच म्हणजे साधासरळ स्वभाव या मुळे लोकांना भाऊ नेहमीच आवडत आले.

या सगळ्यात सर्वात वाखण्याजोगा गुण म्हणजे स्वतः वरच कॉमेडी करण्याच धाडस! स्वताःची खिल्ली उडवण किंवा उडवून घेणं तितकस सोप्प नसतं. पण तेही भाऊ इतक्या सहजतेने निभवून नेतात की त्यांच्या तोडीचा कलाकार होणे नाही असे वाटून जाते.

अवख्या महाराष्ट्रात विनोदवीर म्हणून ओळख असणाऱ्या भाऊंना चागल्या किंवा वाईट परिस्थितीत नेहमीच साथ मिळाली ती आपल्या कुटूंबाची, त्यांच्या पत्नी ममता आणि त्यांची मुले हे नेहमीच भाऊंची ताकद ठरत आले आहेत. भाऊ हे स्वतः कसे अष्टपैलू कलाकार आहेत हे त्यांनी प्रत्येक क्षणी दाखवून दिलं आहे. मग ती स्त्री वेशातली भूमिका असू देत नाही तर एका गाजलेल्या अभिनेत्याची भूमिका भाऊंनी त्याच उत्साहात केली. शांताबाई या लोकप्रिय गाण्यातील शांताबाईला चेहरा मिळवून देणारे भाऊ कधी ही त्या स्त्री वेशात अयोग्य वाटत नाहीत.

त्यांचा स्त्री वेशातील तितकीच सोज्वळता कोणत्याही विचित्रपणाला बळी पडत नाही. त्यांचा तो शांताबाई म्हणून असलेला वावर अगदी सहज वाटून जातो. प्रत्येक पात्रानुसार विनोदाची अचूक फेक करण्यात भाऊ तसे तरबेज कलककार आहेत. आपल्या याच टाईमिंगच्या जोरावर ते आज अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. पानाच्या गादी टाकण्या पासून सुरूवात झालेली भाऊ कदम यांची ही घोडदौड आज यशाच्या शिखरावर पोहचलेली दिसते ती फक्त आणि फक्त त्यांच्यातील सच्या कलाकाराच्या कष्टामुळेच !

चला हवा येऊ द्या च्या आधी भाऊंनी फू बाई फू, घडलय बिघडलय, हे कॉमेडी शो देखील केले. वेगवेगळ्या मालिका, चित्रपट, कॉमेडी शो करत असताना त्यांनी कधी ही साधी राहणी सोडली नाही. आणि याचमुळे सामान्यांप्रमाणे जगताना सिनेसृष्टीची हवा कधीही डोक्यात न जाऊ देता अख्या महाराष्ट्राचा हा ‘भाऊ’ आजही तितकाच आपल्यातला ‘आपला माणूस’ वाटतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *