आंतरराष्ट्रीयताज्या बातम्या

इस्रोची ऐतिहासिक कामगिरी…

195views

२१ नोव्हेंबर १९६३ रोजी ‘ठुंबा’ जिथे मासेमारी प्रमुख व्यवसाय आहे अशा गावातून भारताने पहिले रॉकेट प्रक्षेपण केले आणि सुरु झाला एक नेत्रदीपक प्रवास. ह्या रॉकेटच्या प्रक्षेपणासाठी सर्व सामग्री भारताबाहेरून आणण्यात आली: रॉकेट, हे सर्व वाहून नेणारी यंत्रणा , रडार, संगणक आणि हेलिकॉप्टर! ५० वर्षांनंतर ५ नोव्हेंबर २०१३ रोजी भारताने मंगळयान मोहीमेचा श्री गणेशा केला आणि यासाठी लागणारी सर्व सामग्री भारतातून आली. १० महिन्यानंतर इस्रोने यशस्वीरीत्या मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत सोडले आणि पहिल्या प्रयत्नात ही कामगिरी करणारा पहिला देश हा बहुमान पटकावला…!

स्वातंत्र्यानंतर भारत जेव्हा अन्न आणि इतर मूलभूत गरजांशी झुंजत होता, ईशान्य भारत एक मानहानी कारक युद्धाला सामोरे जात होता तेव्हा होमी भाभा आणि विक्रम साराभाई अवकाश संशोधन मोहीमेचा प्रस्ताव पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याकडे घेऊन आले; आणि अशा परिस्थितीत देखील क्षणाचाही विलंब न लावता नेहरू यांनी परवानगी आणि संपूर्ण साहाय्य देऊ असे या दोघांस कळवले. नेहरू स्वतः ह्या मताचे होते कि विज्ञान आणि तंत्रज्ञान एकत्रितपणे भारताच्या विकासात मोलाची भूमिका बजावतील. यावेळी नेहरूंना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले. “एका बाजूला गरिबी, शिक्षण, अन्न अशा समस्या असतांना नेहरू मृगजळा मागे धावत आहेत; नेहरू करदात्यांच्या पैश्यांचा अपवय करत आहेत असा ही विरोधकांचा सूर होता.

एकेकाळी मासेमारी पलीकडे जग माहित नसणाऱ्या गावातून आज अंतराळाला गवसणी घातली जातेय ही उल्लेखनीय आणि सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे!
________________

गेल्या काही वर्षात ‘भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात’ ‘इस्रो’ ने राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी उंची गाठली आहे. ‘एसएलवी-३’ हे भारताचा पहिला स्वदेशी बनावटीचा उपग्रह प्रक्षेपक वाहन होते. ह्या संपूर्ण प्रकल्पाचे संचालक होते माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम! भारताची मंगळयान मोहीम ही आजवरची जगातील सर्वात स्वस्त अशी मंगळयान मोहीम आहे. मंगळयान मोहीमेचा खर्च अंदाजे ४५० कोटी रुपये आला होता. हा खर्च ‘ग्रेव्हीटी’ ह्या हॉलीवुड चित्रपटापेक्षा ही कमी होता. १९७५ साली पहिला भारतीय उपग्रह ‘आर्यभट्ट’ अंतराळात सोडून इस्रोचा हा प्रवास सुरु झाला. ह्या उपग्रहाचे नाव महान भारतीय खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांच्या नावाहून ठेवण्यात आले होते. ह्या उपग्रहाला ‘कॉसमॉस-३एम’ ह्या उपग्रह वाहकाच्या सहाय्याने कास्पुतीन यानाहून सोडण्यात आला होता. ह्या ‘आर्यभट्ट’ उपग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण भारतीय बनावटीचा उपग्रह होता.


________________

पीएसएलवी:

१९९० साली इस्रोने ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान अर्थात पीएसएलवी विकसित केले. १९९३ साली इस्रोने पहिला उपग्रह पीएसएलवीच्या सहाय्याने अवकाशात सोडला. ही इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेची फार मोठी उपलब्धी होती. यापूर्वी अशी प्रणाली व यंत्रणा केवळ रशियाकडे होती.
________________

चांद्रयान:

२००८ साली चंद्रयान विकसित करून एक इतिहास रचला होता. २२ ऑक्टोबर २००८ रोजी मानव विरहित स्वदेशी बनावटीचे चांद्रयानला चंद्रावर यशस्वीरीत्या पाठवले. या पूर्वी ही कामगिरी फक्त सहाच देश करू शकले होते.
________________

जीएसएलवी मार्क १:

जीएसएलवी मार्क १ ही देखील इस्रोची महत्वाची उपलब्धी आहे. मार्क १ हे एक उपग्रह वाहक यान असून पृथ्वी भोवती एखादा उपग्रह तिच्या कक्षेत सोडण्या साठी उपयोगी आहे. याची यशस्वी चाचणी २००३ साली घेण्यात आली.
________________

जीएसएलवी मार्क २:

जानेवारी २०१४ साली मार्क २ संपूर्ण भारतीय बनावटीचे निमतापी इंजिन होते, ही उपलब्धी हा एक मानाचा तुरा आहे. यापूर्वी आपण रशियन बनावटीचे इंजिन वापरायचो. उपग्रह प्रक्षेपण करणाऱ्या वाहनात असणारे इंधन हे कमी तापमानाचे असते परंतु इंजिन मध्ये तापमान उणे २५३ अंश सेल्सियस पासून २००० अंश पर्यंत वाढू शकते. ह्या अशा कमी तापमानात देखील इंजिनने योग्य कार्यपद्धतीने काम करावं यासाठी इस्रोने कमी तापमानात देखील योग्य काम करणारी मिश्रधातू प्रणाली विकसित केली आहे. ह्या मोहिमेपूर्वी इस्रोला उपग्रह प्रक्षेपण करण्यासाठी इतर राष्ट्रांवर निर्भर रहावे लागायचे.
________________

मंगळयान:

५ नोव्हेंबर २०१३ रोजी सुरु झालेली मंगळयान मोहीम २४ सप्टेंबर २०१४ रोजी ‘मंगळयान’ मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहचल्या बरोबर या मोहीमेचा महत्वाचा टप्पा पूर्ण झाला. मंगळयान मोहिमेनंतर इस्रोचा बोलबाला जगाच्या पाठीवर असणाऱ्या प्रत्येक देशात झाला. इस्रोच्या पहिल्याच प्रयत्नात मंगळयान यशस्वीरीत्या मंगळ ग्रहावर पोहचले. यापूर्वी मंगळ ग्रहावर पोहचणाऱ्या अमेरिका, रशिया व युरोपीय अवकाश संस्था यासारख्या ह्या क्षेत्रातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या देश व संस्थांनाही पहिल्या प्रयत्नात पदरी यश प्राप्त झाले नव्हते ते इस्रोने पहिल्या प्रयत्नात करून दाखवले आणि जागतिक स्तरावर भारतीय विज्ञान व तंत्रज्ञानाची ताकद सिद्ध केली.
________________

भारतीय क्षेत्रीय नौवहन प्रणाली (Indian Regional Navigation System):

२८ एप्रिल २०१६ भारताने आपला सातवा नौवहन (navigation) उपग्रह प्रक्षेपित केला. याबरोबरच भारत हा अमेरिका आणि रशियाच्या पंगतीत रुबाबने जाऊन बसला.
________________

आजचा दिवस इस्रोच्या इतिहासात सुवर्णक्षरात लिहून ठेवावा असाच आहे. जे अमेरिका व रशिया सारख्या बलाढ्य देशाना ही जमलं नव्हतं ते आज श्रीहरीकोटा स्थित ‘सतीश धवन अवकाश केंद्रातून’ इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सहजरीत्या करून दाखवलं! तब्बल १०४ उपग्रह घेऊन ‘पीएसएलवी – ३७ सी’ यानाने अवकाशात झेप घेतली आणि इतिहास रचला गेला.

आजवर रशियाने एकाच वेळी ३७ तर अमेरिकेने २९ उपग्रह अवकाशात पाठवले होते. एकाच वेळी अधिकाधिक उपग्रह वाहून नेल्यास प्रत्येक उपग्रहा मागील उड्डाणाचा खर्च कमी येतो.

ह्या १०४ पैकी फक्त ३ उपग्रह भारताचे आहेत तर १०१ उपग्रह अन्य देशांचे आहेत. ह्या १०१ पैकी ८८ अमेरिकेचे आहेत! भारतीय तीन उपग्रहाचे वजन ७६८ किलो आहे तर बाकी उपग्रहाचे ६०० किलो आहे. हे सगळे विविध उपग्रह एकमेकांना न धडकता पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्याचं आव्हान इस्रो पुढे होतं आणि ते त्यांनी समर्थपणे पेललं याबद्दल निश्चितच आपल्या सर्वांची मान अभिमानाने उंचावणार यात तीळमात्र शंका नाही!
________________

इस्रो ची ही प्रगती २ – २.५ वर्षात नसून यामागे ५ -६ दशकांचे अपार कष्ट आणि त्याग आहे.

इस्रोचा आजवरचा प्रवास आणि इतिहास इस्रोच्याच आजी माजी शास्त्रज्ञाकडून जाणून घ्यायचा असेल तर खालील लिंक वर जाऊन पुस्तक डाउनलोड करा आणि आवर्जून वाचाच:

प्रकाशक: स्वतः इस्रो संस्था

http://www.isro.gov.in/pslv-c25-mars-orbiter-mission/fishing-hamlet-to-red-planet-download-e-book

© राहुल सुधाकर कराळे

#जागर_इतिहासाचा
#ISRO

Leave a Response