मनोरंजन

कोरोना व्हायरसमुळे शनाया जवळ बाळगतेय ‘ही’ अत्यावश्यक गोष्ट

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशभरातही कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे सरकारने नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून सेलिब्रेटीही सध्या घरी बसले आहेत. त्यामुळे अनेक सेलिब्रेटी नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून घरी राहण्याचे आवाहन करत आहेत.  यामध्ये प्रसिध्द अभिनेत्री इशा केसकरने देखील नागरिकांना अत्यावश्यक वस्तू जवळ बाळगण्याचे आवाहन केले आहे.

इशा केसकरने खूप मजेशीरपणे तिच्या जवळची अत्यावश्यक गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तुम्हालाही ही गोष्ट समजली तर तुम्हाला हसू आवरणार नाही.

सोशल मीडियावर नेहमी अक्टिव्ह असणारी इशा ‘काहे दिया परदेस’ फेम ऋषी सक्सेनाला डेट करत आहे. तिने ऋषीबरोबरचे काही फोटो शेअर करत ‘अत्यावश्यक गोष्टी जवळ बाळगा’ असं सांगितलं आहे.

सध्या चित्रपट, मालिकांचे शूटिंग रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे होम क्वारंटाइनचे अनेक फोटो सिनेसृष्टीतील कलाकारांनी शेअर केले आहेत. ऋषी आणि इशा देखील एकमेकांबरोबर क्वारंटाइन टाइम एन्जॉय करताना दिसत आहेत.

हा फोटो शेअर करताना इशाने #gocorona असा हॅशटॅग तर वापरलाच आहे, पण त्याचबरोबर #phaktaprem आणि #premalafilternasava हे हॅशटॅग देखील वापरले आहेत. तिच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी त्यांची जोडी सगळ्यात बेस्ट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे, तर ‘सोशल डिस्टन्सिंग’ विसरले की काय अशी खोचक कमेंट देखील केली आहे.