देश बातमी विदेश

तत्काळ कर्ज देणाऱ्या अँप्सपासून जरा लांबच रहा, नाही तर खिश्यात जे आहे ते पण गमावून बसाल…

आजकाल बरेच ऑनलाईन फ्रॉड होत आहे. फ्रॉड करणारे विविध शक्कल लढवून लोकांना लूटत आहे. असाच अजून एक फ्रॉड नुकताच उघडकीस आला. यात त्वरित कर्ज मिळवण्यासाठी मदत केली जाते. विशेष म्हणजे यात अधिकृत कागदपत्रांची देखील गरज नाही असे सांगितले जाते. यामुळे कोणत्याही त्रासा विना कर्ज मिळत आहे म्हणून ग्राहक कर्ज घेण्यास तयार होतात. ही कर्ज देऊन फसवणूक करणे जरी जूने असले तरी आत्ता फसवायची पध्दत फारच नविन आहे. गेल्या काही दिवसांत देशभरातून अशा अनेक घटना घडल्या. हे घोटाळे मोबाईल अ‍ॅप्सद्वारे करण्यात आले होते, त्यापैकी एकही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) मंजूर केलेली नाही. यामध्ये प्रथम इन्स्टंट कर्जाच्या शोधत असलेल्या लोकांना अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. हे अ‍ॅप नंतर त्यांना आपला आधार, पॅन चा तपशील आणि अर्जदाराचा सेल्फी जमा करायला सांगते व पुढे जितके कर्ज हवे त्यानुसार कर्जाच्या विनंतीवर प्रक्रिया केली जाते. ते अँप वापरकर्त्यांची फोटो गॅलरी आणि फोन संपर्क यादीमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मागतात. व या मुळे ग्राहकांचा पर्सनल डेटा शेअर होतो. कर्ज त्वरित मंजूर होत असताना अर्जदारास परतफेड करण्यासाठी सात दिवसांची मुदत मिळते. तथापि, तेथे प्रचंड व्याज आणि प्रक्रिया शुल्क आकारले जातात. जेव्हा कर्जदार देय तारखेला रक्कम परतफेड करण्यात अयशस्वी होतात तेव्हा समस्या सुरु होतात. नंतर सावकार देशभरातून कार्यरत कॉल सेंटरद्वारे नियोजित शिवी, छळ आणि धमक्या यांचा सर्रास फोन सुरू करतो. ह्याही पेक्षा भयानक म्हणजे छळाचा दुसरा मार्ग म्हणून, कर्जदारांकडील पर्सनल माहिती लीक केली जाते. हा डेटा वापरुन आरोपी ग्राहकांना धमकवण्याचा प्रकारही समोर आला. काही वेळा त्रास देणे म्हणजे कर्जदारांना त्यांच्या नातेवाईकांना आणि कुटुंबातील सदस्यांना बनावट कायदेशीर नोटीस पाठवून ब्लॅकमेल चे कॉल करणे.
तसेच ते कर्जदारांच्या फोन बुकचा गैर वापर करून व्हाट्सएप गट तयार करतात आणि अश्लील संदेश पाठवतात.
यातूनच पुढे त्रासाला वैतागून कर्जदारांना विद्यमान कर्जाची परतफेड करण्यासाठी अधिक कर्ज घेण्यास भाग पाडले जाते.

कधीकधी कर्जाची रक्कम त्यांच्या परवानगीशिवाय कर्जदारांच्या खात्यात जमा केली जाते आणि त्यानंतर जास्तीची रक्कम परतफेड करण्यासाठी त्यांना त्रास दिला जातो.
अखेरीस, ग्राहक कधीही न संपणार्‍या चक्रात अडकतात.
काही कर्जदारांनी याविरूध्द तक्रार केल्यावर या आर्थिक व्यवहाराच्या प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की आतापर्यंत सुमारे 21,000 कोटी रुपयांचे 1.4 कोटी व्यवहार झाले आहेत. ईडी ने या प्रकरणाची चौकशी केली असता हैदराबाद, बेंगळुरू, गुरुग्राम आणि चेन्नई येथे अशा अनेक घटनांमध्ये काही चिनी नागरिकांसह अनेकांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाची चौकशी करत असताना पोलिसांना असे आढळले की कर्ज अर्ज सर्व्हर चीनमध्ये आहेत. मॅड एलिफंट टेक्नॉलॉजीज, बोरानॅक्सी टेक्नॉलॉजीज, प्रॉफिटाइज टेक्नॉलॉजीज आणि विझप्रो सोल्युशन्स या बंगळुरुमधील चार कंपन्यांवर त्यांनी छापा टाकला होता आणि मुख्य आर्थिक अधिकारी आणि मानव संसाधन व्यवस्थापक यासह दोन जणांना अटक केली होती. या चार कंपन्यांपैकी तीन कंपन्यांचे संचालक चिनी होते.

पुढील तपासात असे आढळले आहे की मुख्य आरोपी बेंगळुरुहून कॉल सेंटर चालवणाऱ्या दोन भारतीय नागरिकांच्या मदतीने चीनमधून कार्यरत होता. विशेष म्हणजे त्वरित ऑनलाइन कर्ज देण्यासाठी कंपनीने 100 हून अधिक लोकांना नोकरी दिली होती.
प्रत्येक कर्मचार्‍यांना आठवड्यातून किमान 10 लोकांना त्वरित कर्ज मंजूर करण्यास सांगण्यात आलेले आणि जर ते असे करण्यात अपयशी ठरले तर त्यांना काढून टाकण्याची धमकी देण्यात आली. या सर्वांना बेंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे.

हैदराबादमध्येही अशीच घटना घडली. अ‍ॅग्लो टेक्नॉलॉजीज, ल्युफॅंग टेक्नॉलॉजीज, नब्लूम टेक्नॉलॉजीज, पिनप्रिंट टेक्नॉलॉजीज या कंपन्यांमार्फत चालविल्या जाणाऱ्या अ‍ॅप्सच्या संचालनाचे प्रमुख म्हणून 27 वर्षीय चिनी नागरिकाला अटक करण्यात आली. विचारपूस केल्यावर उघडकीस आणले की युआन युआन नावाच्या चिनी नागरिकाने भारतात कर्ज अॅपचे कामकाज सुरू केले. युआन सध्या परदेशात आहे. 1,100 हून अधिक सिमकार्ड खरेदी करून आरोपींना देण्यात आली. हैदराबाद पोलिसांनी 423 कोटी रुपये असलेली 75 बँक खाती गोठविली तेव्हा हा सावकारी घोटाळा नीट उघडकीस आला.

देशभरातून असे घोटाळे झाल्याचे वृत्त येऊ लागल्यामुळे, आरबीआयने सामान्य नागरिकांना अशा अनधिकृत कर्ज देण्याच्या प्लॅटफॉर्म आणि मोबाईल अ‍ॅप्सविरूद्ध सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. आरबीआयने ग्राहकांना केवायसी विषयीची कागदपत्रे कोणत्याही अज्ञात व्यक्ती आणि खोट्या अ‍ॅप्सना शेअर न करण्याचे आवाहन केले. तसेच अशा प्रकारच्या अ‍ॅप्स किंवा संबंधित बँक खात्याची माहिती संबंधित अंमलबजावणी एजन्सीना कळवावी किंवा ऑनलाइन तक्रार दाखल करण्यासाठी सचेत पोर्टलचा वापर करण्यास सांगितले.

यासगळ्या फसवणूकी मुळे किमान पाच जणांनी आपले जीवन संपवल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *