इतिहास

‘सामना’ची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केलीच नाही…’हे’ वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल

‘सामना’ हे देशातलं एकमेव असं दैनिक आहे जे कायम चर्चेत असतं. म्हणजेच देशभरातील प्रादेशिक आणि राष्ट्रीय माध्यमंसुद्धा एखाद्या मुद्द्यावर ‘सामना’च्या अग्रलेखात काय लिहिलंय यावर लक्ष ठेवून असतात. ‘सामना’त छापलेली बातमी किंवा अग्रलेख इतरांसाठी ‘बातमी’चा विषय असतो.

शिवसेना म्हणजे सामना आणि सामना म्हणजे शिवसेना असं समीकरण झालं आहे. पण ‘सामना’ची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केलीच नाही, हे वाचून आश्चर्य वाटेल. 1966मध्ये शिवसेनेचा जन्म झाला, तेव्हा ‘मार्मिक’ या व्यंगचित्र साप्ताहिकातून शिवसेनेची भूमिका मांडली जायची.

1988 साली शिवसेनेचे दैनिकही असावे अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली आणि त्याबाबत विचार होऊ लागला. बाळासाहेबांनी ‘सामना’ हे नावही सुचवलं. परंतु नोंदणीच्या वेळी हे नाव सोलापुरातील बार्शीमध्ये राहणारे पत्रकार आणि संपादक वसंत कानडे यांच्या नावावर होतं.

सुभाष देसाई बार्शीत गेले असताना त्यांची वसंत कानडे यांच्यासोबत भेट झाली. आपल्या बातम्या आणि लेख यावेत या माफक अटीवर वसंत कानडे यांनी ‘सामना’ नावाला परवानगी दिली. शिवसेनेचा ‘सामना’ दैनिक स्वरुपात असला तरी कानडे यांचा सामना साप्ताहिक स्वरुपात प्रसिद्ध होत होता. 2002 साली वसंत कानडे यांचं निधन झालं.

वसंत कानडे कोण होते?
वसंत कानडे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याचे. माढा आणि बार्शी तालुक्यातून त्यांनी पत्रकारिता केली. “वसंत कानडे यांचे कुर्डुवाडीतील शिवसेनेचे नेते प्रकाश गोरे यांच्याशी चांगले संबंध होते. त्यांच्यामुळेच शिवसेनाप्रमुखांची भेट आणि सामनाच्या नावाचे हस्तांतर झाले. शिवसेनेचा सामना दैनिक स्वरूपात असलं तरी कानडे यांचा सामना साप्ताहिक स्वरूपात प्रसिद्ध होत होता. वसंत कानडे यांनी 10 ऑक्टोबर 1975 रोजी साप्ताहिक सामनाचा पहिला अंक प्रसिद्ध केला.

या अंकाचं उद्घाटन महाराष्ट्राचे तत्कालीन युवक कल्याण राज्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.पहिल्याच अंकामध्ये संपादक कानडे यांनी सुशीलकुमार शिंदे, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेवराव जगताप, माजी आमदार बाबूराव पाटील यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.