इतिहास

डॉ.कलाम साहेब म्हणाले, ‘मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला सुमारे अडीच तास उभं राहावं लागलं’

“Creating a livabale planet earth” हा IIM शिलॉंग मध्ये डॉ.कलाम साहेबांच्या लेक्चरचा टॉपिक होता. त्यांनी या टॉपिकला तत्कालीन पंजाबमध्ये झालेल्या अतिरेकी हल्याशी जोडलं होतं. कलाम साहेब त्या एका घटनेने प्रचंड चिंतेत असायचे. निष्पाप लोकांच्या निधनाचं त्यांना खूप दुःख होतं. ते म्हणाले होते, “प्रदूषणा प्रमाणे माणूसही पृथ्वीसाठी धोकादायक ठरतोय, अशाच बेलगाम हिंसा होत राहिल्या तर पुढच्या तीस वर्षात आपल्याला ही धरती सोडल्या वाचून पर्याय राहणार नाही.”

एकदा असच नेहमी प्रमाणे दोन दिवस संसदेचं कामकाज तहकूब केलं जातं होतं त्यावेळी ते म्हणाले होते. “मी माझ्या कारकिर्दीत दोन वेगवेगळ्या सत्ताधाऱ्याना पाहिलं आहे, त्या नंतरचाही काळ पाहिला आहे. हा गोंधळ नेहमीच होत असतो, हे बरे नव्हे” त्यावेळी त्यांच्या पीएला ते म्हणाले होते. “मी खरोखरच एका अश्या पद्धतीचा शोध घेत आहे, ज्यामुळे संसदेने विकसीत राजकारणासाठी कार्यशील राहायला हवं” ते पुढे म्हणाले. “IIM शिलॉंगच्या विध्यार्थ्यांना एक सरप्राईज असंटमेंट द्या”. त्यांना वाटायचं IIM शिलॉंगच्या विद्यार्थ्यांनी काही पद्धती सुचवाव्या ज्यामुळे पार्लमेंट चांगलं व प्रगत काम करू शकेल. पण नंतर लगेच त्यांनी माघार घेतली, जर माझ्याकडे अशी एकही पद्धत नाही तर मी मुलांकडे तरी कसली अपेक्षा करू. हे त्यांनी बोलून दाखवलं.

या दौऱ्यावर जात असताना गुवाहाटी एअरपोर्टहून शिलॉंगला जाण्यासाठी त्यांचा आठ-दहा गाड्यांचा ताफा निघाला. डॉ.कलाम साहेब आणि त्यांचा पी.ए एका गाडीत होते. त्या ताफ्यात सगळ्यात पुढे एक खुली जिप्सी होती ज्यावर टॉप नव्हता. त्या जिप्सीत तीन सैनिक होते. दोन सैनिक बसून होते तर एक सैनिक हातात बंदूक घेऊन पहरा देत उभा होता. एका तासाच्या प्रवासानंतर कलाम साहेबांनी प्रश्न विचारला “तो का उभा आहे? त्याला थकवा येईल, हे तर शिक्षा दिल्या सारख आहे, तुम्ही त्याला वायरलेसवर मेसेज देऊन बसायला सांगा”

त्यांच्या सांगण्यावरून पीएने वायरलेसवर मेसेज देण्याचे निष्फळ प्रयत्न केले व सोडून दिले. पुढचा दीड-एक तास कलाम साहेबानी पीएला इशारा करून त्या सैनिकाला बसवायला सांगितलं पण प्रोटोकॉल मुळे ते शक्य झालं नाही. मग ते म्हणाले “जेंव्हा आपला ताफा थांबेल तेव्हा मला या सैनिकाला भेटून त्याचे आभार मानायचे आहेत” आणि खरोखर त्यांनी न विसरता तस केलं सुद्धा. त्या सैनिकाला भेटून म्हणाले. तुम्ही खूप थकलात का? तुम्हाला काही खायची इच्छा आहे का? एवढंच नव्हे तर कमाल साहेबांनी त्याची माफी मागितली, म्हणाले “मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला सुमारे अडीच तास उभं राहावं लागलं.”

तो सैनिक हे सगळं ऐकून हैराण झाला होता. तो फक्त एवढंच म्हणाला. “सर, तुमच्यासाठी तर मी सहा तास उभा राहू शकतो” त्यांची कारकीर्द मोठी होतीच हे तर जग जाहीर आहे. पण कलाम साहेब माणूस म्हणून खूप मोठे होते… राहतील.

– सुहास हाटकर