इतिहास

‘त्या’ रात्री नेमके काय घडले होते कोंढाणा किल्ल्यावर?

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे ४०० वर्षांपूर्वी शुर योद्धा तान्हाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ल्यावर गाजवलेला तो पराक्रम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या.

सिंहगडाचे मूळ नाव कोंढाणा असे होते. हा किल्ला पहिल्यांदा आदिलशाहीकडे होता. तेथे दादोजी कोंडदेव हे सुभेदार होते. हा गड शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना दिला. त्या गडावर उदेभान राठोड जो एक राजस्थानातील राजपूत होता. नंतर त्याने धर्मांतर केले, तो येथे मोगलांतर्फे कोंढाण्याचा सुभेदार होता.

शिवाजी महाराजांनी हा गड परत मिळवण्यासाठी तान्हाजी मालुसरे यांची निवड केली होती. त्यांनी आपल्या मुलाचे लग्न बाजूला ठेऊन मोहीमेवर जाण्याची तयारी दर्शवली. आश्चर्याची बाब म्हणजे तानाजी आपल्या मुलाचे लग्न लांबणीवर टाकून केवळ ५०० मावळ्यांसह कोंढाण्याच्या मोहीमेवर गेले होते. त्यावेळी त्यांनी उच्चारलेले “आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं” हे वाक्य आजही इतिहासात दुमदुमत आहे.

गडावर झालेल्या लढाईदरम्यान तान्हाजी मालुसरे यांना वीरमरण आले. तीच लढाई पुढे त्यांचे भाऊ सूर्याजी मालुसरे यांनी सुरु ठेवली. आणि विजय संपादन करुन किल्ल्यावर भगवा फडकवला. ज्यावेळी शिवाजी महाराजांना किल्ला जिंकल्याची व तान्हाजी यांच्या बलिदानाची माहिती समजली तेव्हा महाराज “गड आला पण सिंह गेला” असे उद्गारले होते. यानंतर या गडाचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आले.