इतिहास

जगभरात बोलल्या जाणाऱ्या या १० भाषेचं महत्व तुम्हाला माहित आहे का?

जगभरातल्या विद्यापीठात विविध भाषा शिकवण्या मागे त्या भाषांचे जागतिक महत्त्व कारणीभूत असतं. विशेषतः त्या भाषेचं ज्ञान तुम्हाला जगात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देतं. कारण एका नव्या इंग्रजी म्हणी नुसार “वन लँग्वेज इज नॉट इनफ” इंग्रजी आली म्हणजे तुम्ही जगात कुठेही स्थायिक होऊ शकता हा निव्वळ गैरसमज आहे. त्यासाठी जगातल्या 10 मोठ्या भाषेच महत्व जाणून घेऊया.

फ्रेंच – इंग्रजा प्रमाणे फ्रेंच लोकांनी देखील जगातल्या अनेक भागात शासन केल्याचं आपल्याला माहिती आहे. आणि त्या ठिकाणी होणाऱ्या व्यवहारात त्यांनी आपल्या भाषेचा प्रसार करत गेले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की, फ्रेंच जगातील २८ देशांची राष्ट्रभाषा आहे. आणि जगातील सुमारे २३ कोटी लोक फ्रेंच बोलतात. सगळ्यात महत्त्वाची बाब यापैकी फक्त ७.५ कोटी लोक फ्रान्सचे रहिवाशी आहेत. उर्वरित सर्व विदेशी आहेत. ही भाषा फक्त युरोपातच नव्हे तर आफ्रिका खंडातील बऱ्याच भागात बोलली जाते. आपल्या भारतात पॉंडेचरी व गोव्यात काही फ्रेंच भाषिक आढळतात.

पोर्तुगीज – फ्रेंच प्रमाणे पोर्तुगीज देखील जगातील सुमारे २३ कोटी लोकांची बोली भाषा आहे. तसेच वर्तमान काळात ही जगातील ८ देशांची राष्ट्रीय भाषा आहे. पोर्तुगालची भाषा आज त्यांच्या देशाहून अधिक ब्राझील मध्ये प्रसिद्ध आहे. पोर्तुगीज बोलणारे अर्ध्याहून अधिक लोक ब्राझील मध्ये राहतात. बऱ्याच लोकांना माहिती नाही की पोर्तुगीज भाषा बोलणाऱयांना ‘लॉसॉफोन’ म्हटलं जातं. हा शब्द लोसिटीनहुन घेण्यात आला आहे, रोमन साम्राज्याचा लोसिटीन भाग म्हणजे आजच पोर्तुगाल स्थित असलेलं ठिकाण.

बंगाली – बंगाली आपल्या देशातली एक महत्वाची भाषा आहे. अर्थात रवींद्रनाथ टागोर यांच्या जगा वेगळ्या बंगाली साहित्यामुळे. बंगाली भाषेचा गोडवा खूपच कमी भाषेत जाणवतो. म्हणूनच ही जगातल्या 24.5 कोटी लोकांची भाषा आहे. बंगाली किंवा बांग्ला ही बांग्लादेशाची राष्ट्रीय भाषा आहे. तसेच पश्चिम बंगाल सहित भारताच्या बऱ्याच राज्यात प्रसिद्ध आहे. या सोबतच ही भारताची सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाची भाषा आहे, अर्थात हिंदी भाषिकांची संख्या प्रथम क्रमांकावर कायम आहे.

रशियन – ही भाषा एशिया तसेच युरोपातील कित्येक देशात प्रसिद्ध आहे आणि जवळपास 27 कोटी लोकांद्वारे बोलली जाते. रशिया,पेलरूस, कझाकीस्थान आणि किरगिस्थानची राष्ट्रीय भाषा म्हणून रशियनला मान्यता आहे. कधीकाळी सोव्हियेत संघात असलेल्या देशांची चांगलीच पकड या भाषेने धरून ठेवली होती. तसेच युरोपात बोलल्या जाणाऱ्या इतर भाषेहून अधिक मुलनिवासी लोकांची ही भाषा आहे.

मलय – मलय भाषा 28 कोटीहून अधिक जनसंख्येची बोलीभाषा आहे. ही इंडोनेशिया, मलेशिया, ब्रोने आणि सिंगापूरची राष्ट्रीय भाषा तर आहेच, शिवाय थायलँड आणि फिलिपीन्स मध्ये तुम्हाला मलय भाषिक मोठ्या प्रमाणात आढळतील. मलेशियात बहास मलय तर इंडोनेशियात बहासा इंडोनेशिया नावाने ओळखलं जातं. पण ह्या एकाच भाषेच्या वेगवेगळ्या बोल्या आहेत. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या कोकणी, वऱ्हाडी, मालवणी प्रमाणे. त्यामुळे हा पुसटसा फरक असला तरी हे एकमेकांची भाषा सहज समजून घेऊ शकतात.

अरेबिक किंवा अरबी – तुम्हाला माहितीय का युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र संघांच्या 6 अधिकारीक भाषा कोणत्या आहेत? त्या आहेत इंग्रजी, फ्रेंच, चिनी, कॅटनिंन मँडरेन,स्पॅनिश,रशियन आणि अरेबिक. यावरून जगभरातल्या अरेबिक भाषेचं वर्चस्व आणि महत्व लक्षात येईल. ही जगातील 26 देशांची प्रशासकीय भाषा आहे तसेच जगातील 42 कोटी लोकांची ही बोली भाषा आहे.इस्लाम धर्मात सांगितलं जातं की जेंव्हा ईश्वराने हजरत मोहमद यांना पवित्र कुराणचं ज्ञान दिलं होतं त्यावेळी त्यांची भाषा अरेबिक होती.

स्पॅनिश – स्पॅनिश बोलणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं झालं तर यांची संख्या जगभरात सुमारे 52 कोटीहुन अधिक आहे. आणि यापैकी 33 करोड लोकांची ती मूळ भाषा आहे. इतिहासात स्पॅनिश शोधकांनी या भाषेचा सर्वदूर प्रचार आणि प्रसार केला हेच या भाषेच्या प्रसिद्धीच कारण आहे. उत्तर अमेरिकेतील मेक्सिको मध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा स्पॅनिश आहे तसेच दक्षिण अमेरिका, आफ्रिका, जगभरातल्या बेटांवर मोठ्या प्रमाणात स्पॅनिश बोलली जाते.

हिंदी – हिंदी आपल्या देशाची फक्त भाषा नसून तो भारतीय संस्कृतीचा गौरव मानला जातो. विशेष म्हणजे हिंदी बोलणाऱ्यांची संख्या 55 कोटीहून अधिक आहे. ही फक्त भारतात नाही तर नेपाळ, मॉरिशस,फिजी, त्रिनिदाद व टोबॅगो मध्ये सुद्धा बोलली जाते. खूप कमी लोकांना हे माहिती असावं की हिंदी जगातल्या त्या सात भाषा पैकी आहे ज्यामधे वेब अड्रेस लिहिला जाऊ शकतो.

इंग्रजी – जगभरातला कोणताही देश असो किंवा कुणीही व्यक्ती असो कुणाही इंग्रजी भाषेचा परिचय देण्याची विशेष गरज नाही. आज इंग्रजीला युनिव्हर्सल लँग्वेज म्हणून ओळखल जातं. याच पूर्ण श्रेय जातं त्या ब्रिटिश साम्राज्याला ज्याचा सूर्य कधीच मावळत नव्हता. इंग्रजी भाषेचा इतिहास फार जुना नसला तरी ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या 1 अब्जहून अधिक आहे. ही जगातील 60 हून अधिक देशांची राष्ट्रीय भाषा आहे. इंग्रजीने प्रत्येक क्षेत्रात तीच महत्व एवढं वाढवून ठेवलंय की आज आपण जाणीवपूर्वक या भाषेला स्वतःहुन वेगळं करू शकत नाही.

मँडेरिन – मँडेरिन चीनची राष्ट्रीय भाषा असून आपण ह्या भाषेला चिनी भाषा म्हणून ओळखतो. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की फक्त चीन मध्ये ही 90 कोटीहून अधिक लोकांची मातृभाषा आहे. जगभरात हा आकडा 1.2 अब्ज वर पोहचतो. मँडेरिन शब्दाचा अर्थ होतो सामान्य लोकांची भाषा. पण मित्रांनो या भाषा शिकणे फार कठीण आहे. अस म्हटलं जातं मँडेरिन भाषेतील एखादा सामान्य लेख वाचायचा असेल तर तुम्हाला या भाषेतील सुमारे 2 हजार शब्दाच ज्ञान असणे गरजेचे आहे. या भाषेला दोन प्रकारात विभागण्यात आलं आहे, पारंपरिक मँडेरिन जी हॉंगकाँग, तायवान आणि मकाऊ मध्ये बोलली जाते आणि सरल मँडेरिन जी चीन मलेशिया व सिंगापूर मध्ये प्रचलित आहे.

– सुहास हाटकर, नांदेड