मराठी सण

आपण साजरा करणाऱ्या होळी दहनामागची गोष्ट..

2.46Kviews

फाल्गुन हा दक्षिणेत वर्षाचा शेवटचा मास गणिला जातो. हा इंग्रजी मार्च महिन्याच्या सुमारास येतो. श्रीकृष्णाप्रीत्यर्थ या महिन्यात गाई, तांदूळ व वस्त्रे यांची दाने करावी असे काही पौराणिक संदर्भ सांगतात. फाल्गुनी पौर्णिमा ही मन्वादि आहे. या तिथीला होलिका असे म्हणतात. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला जो सण साजरा केला जातो त्यास होलिकोत्सव असे म्हणतात. ‘होळी’ हा शब्द ‘होलिका’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. याशिवाय ‘होलाका’ असेही म्हणतात. होलाका म्हणजेच ‘वसंतमहोत्सव’. स्थानपरत्वे यास शिमगा, होलिकादहन, हुताशनी महोत्सव, दोलायात्रा अशी नावे आहेत. उत्तरेत दोलायात्रा, कोकण महाराष्ट्रात शिमगा व होळी आणि दक्षिणेत कामदहन.
दैत्यराज हिरण्यकशिपूच्या बहिणीचे नाव होलिका. अग्नीपासून तुला मुळीसुद्धा भय राहणार नाही असा वर तिला मिळाला होता. या वराचा फाजील फायदा घेण्याचा तिने एकदा प्रयत्न केला. तिने दुष्टाव्याने आपला भाचा भक्त प्रल्हाद याला जिवंत जाळण्याचा उद्देशाने त्यास आपल्या मांडीवर घेऊन ती धडधडत्या अग्नीत जाऊन बसली. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की तीच स्वतः दग्ध होऊन बाल प्रल्हाद वाचला. निरपराध प्रल्हाद वाचल्यामुळे लोकांना अतिशय आनंद झाला व त्याप्रीत्यर्थ हा सण साजरा करण्यास सुरुवात झाली.

महाराष्ट्रात होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होत असला तरी कोकणातल्या होळीच वैशिष्ट्य निराळच आहे. कोकणातील सर्व जातीतील लोक मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. वर कोकणापासून तळ कोकणापर्यंत शिमग्याचा आपआपल्या रीतवैशिष्ट्यानुसार जल्लोष असतो. सुरमाड, पोफळी, आंबा अशा वेगवेगळ्या रुपात होळी सजते. तासे, कर्णे, ढोल, सनई वगैरे वाद्यांसह नृत्यगायन कौशल्य वारांगना बाहेर पडतात. त्यांना खेळे असे म्हणतात. देवाच्या पालखीसह हे खेळे लोकांच्या घरोघरी जातात आणि आपली कला सादर करून लोकांचं मनोरंजन करतात. पालखी घरी येणार, देव आपल्या घरी येणार म्हणून सारवून, गेरूने रंगवून, चुना-रांगोळीची नक्षीचित्रे काढून, गोडधोडाचा नैवेद्य करून, आनंदी मनाने घर तयार असते. पालखीसोबत आलेल्या गावकऱ्यांच्या चहापाण्याची, पानविड्याची, अगदी जेवणाची सुद्धा सोय असते. या दिवसात देवळात उत्सवी, जत्रेमय वातावरण असते. गोंधळ, दशावतार, नमन, जाखडी नृत्य, राधा नाच, गोमू अशा विविध लोककला त्यावेळी सादर होतात. देवाचा उदोउदो केला जातो, कौल लावले जातात, गाऱ्हाणी घातली जातात, त्याच्याकडून सुखाचा आशीर्वाद घेतला जातो व याकरताच कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी त्यावेळी कोकणात येतो.
भारताप्रमाणेच अन्य देशातूनही होळीसारखा उत्सव साजरा केला जातो. झेकोस्लोव्हेकिया मधे अशा या सणास ‘वेलीकोनोत्से’ असे नाव आहे. तर इंग्लंड, बेल्जम, फ्रान्स येथे या सणास ‘फूल्स फेस्टीव्हल’ असे म्हणतात.

Leave a Response