आपल्या निसर्गाच्या सौंदर्याने प्रसिद्ध असणार मेळघाट आता आपल्या भूपुत्रामुळे प्रसिद्धीच्या जोतात आला आहे. मेळघाटचे रहिवासी असणारे संतोष सुखदेवे यांनी मेळघाटाच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा बसवण्याचे कार्य केले आहे.
संतोष सुखदेवे, आयएएस यांनी आज उपायुक्त / मुख्य कार्यकारी अधिकारी, एलएडीडीसी कारगिल म्हणून पदभार स्वीकारला.
धारणी तालुक्यातील अत्यंत लहान अशा आदिवासी पाड्यात असणाऱ्या नारवाटी मध्ये ते वाढले. व पुण्यात येऊन त्यांनी आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी नागरी सेवा पूर्व परिक्षाचे अभ्यास सुरू केला व त्यात ही त्यांनी यश मिळवले.
नुकतेच ते कारगिल जिल्ह्याचे ३० वे उपायुक्त म्हणून नियुक्त झाले. एलजीएडीसी कारगिल, बसेर उल हक चौधरी, (आय.ए.एस.) यांंच्या जागी संतोष यांची नेमणूक करण्यात आली. संतोष सुखदेवे, २०१७ च्या बॅचचे जम्मू-काडर बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी उप-निबंधक, माहोर यांचा अतिरिक्त कार्यभार, याच बरोबर माहोर येथील उपविभागीय दंडाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
कारगिल जिल्ह्यातील कार्यभार स्वीकारताना संतोष सुखदेवे म्हणाले की संघ कार्य आणि लोकसेवा हा त्यांचा नेहमीच हेतू असेल आणि सार्वजनिक सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करून त्यांच्या आधीची विकासकामे पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. आणि वचनबद्धता आणि समर्पण सह सामान्य लोकांचे कल्याण कसे होईल याकडे लक्ष दिले जाईल.
विकास कार्य व कल्याणकारी योजनांची योग्य व सुरळीत अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी पाठिंबा द्यावा, जेणेकरून मोठ्या प्रमाणात जनतेचा, खासकरुन गरीब आणि निराधारांना फायदा व्हावा, असे आवाहन नवीन डी.सी. झालेल्या संतोष यांनी केले.
दरम्यान, बदली झालेले डी.सी. बसेर उल हक चौधरी यांनी जिल्हा अधिकाऱ्यां समवेत नवीन डीसीची ओळख करुन दिली आणि त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.