लाइफफंडा

ताण-तणावापासून सुटका करायची असेल तर ‘या’ गोष्टी करा

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम कळत-नकळत माणसाच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. कामाचा ताण, कौटुंबिक वाद, वाढती महागाई या सगळ्याचा परिणाम मनावर होऊन त्याचे तणावात रुपांतर होते. सारखा ताण घेऊन-घेऊन कधी नैराश्य येते हे देखील अनेकांना समजत नाही. चला तर मग आज आपण जाणून घेऊयात या तणावातून बाहेर कसे पडायचे.

अनेकदा असे होते की, ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या गोष्टीपासून माणूस दूर पळण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ती समस्या कमी होत नाही उलट आणखी वाढते. यासाठी तुम्ही सगळ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी स्वतःच्या मनाला शक्तीशाली बनवा. समस्या तुम्हाला मजबूत करत असतात आणि तुम्ही जीवनाकडे  प्रॅक्टिकल पध्दतीने बघायला लागता.

समस्या काय आहे हे न समजू शकणं किंवा कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला स्ट्रेस येतोय हे न समजणं जास्त धोकादायक असतं. त्यामुळे तुमचे प्लस पॉइंट शोधा आणि समस्या दूर करण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळे पर्याय शोधा ऑफीसमध्ये तुमचा बॉस तुमच्या कामाने संतुष्ट नसेल तर त्यांच्याशी बोला. बॉसकडून सुधारणेसाठी टिप्स घ्या. बोलण्यात संकोच करु नका. त्यामुळे तुमचा तणाव थोडा कमी होईल. जर कुटुंबामध्ये काही समस्या असेल तर घरातल्यांशी बोलून ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा.

जेव्हाही तुम्ही खूप तणावामध्ये असाल तेव्हा हळूवार मोठा श्वास घेण्यास सुरुवात करा आणि आपल्या श्वासावर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही मोठा श्वास घेता तेव्हा तुमच्या हृदयाची गती कमी होते. आणि हृदय तुमच्या मेंदूला संकेत पाठवतो की, सगळं काही ठीक आहे घाबरण्याची अजिबात गरज नाही.

जर तुम्ही तणावात असाल तर तुमच्या मित्र-मैत्रीणींशी बोला. त्यामुळे तुमचा तणाव कमी होऊ शकतो. बाहेर फिरायला जा यामुळे तुमचा मुड फ्रेश होईल.

ज्या गोष्टी तुम्हाला करायला आवडतात त्यामध्ये तुमचे मन गुंतवा त्यामुळे देखील तुमचा तणाव कमी होईल.