लाइफफंडा

उद्या अशी करा गुढीपाडव्याची पूजा; पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केलं मार्गदर्शन

उद्या गुढीपाडवा आहे. उद्यापासून मराठी नव्या वर्षाची सुरवात होत आहे. आनंदाची, मांगल्याची गुढी उभी करून तिचं पूजन करून नवा संकल्प करायचा असतो. मात्र जगभरासह भारत आणि महाराष्ट्रावर आलेलं कोरोनाचं संकट दूर व्हावं यासाठी सर्वच जण उद्या गुढी उभारताना प्राथर्ना करतील.

संपूर्ण देश आज मध्यरात्रीपासून पुढचे 21 दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली जाणार आहे.त्यामुळे गुढी पूजनासाठी आवश्यक ते साहित्य, बत्तासे, फूल, कडूनिंब मिळालं नाही तर काय करावं? तर चिंता करू नका यंदाही आपण गुढीपाडवा आपल्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं साजरा करू शकता. मोहन दाते पंचांगकर्ते यांनी कशी गुढी उभी करायची आणि पूजा कशी करायची याचं मार्गदर्शन केलं आहे.

मोहन दाते पंचांगकर्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी वैश्विक आपत्तीमुळे गुढीपूजनाला साखरेची माळ, कडुनिंबाचा फाटा मिळाला नाहीतर , पारंपरिक पद्धती ऐवजी घरी असलेल्या काठीस रेशमी वस्त्र किंवा नवे वस्त्र बांधून ब्रह्मध्वजाय नमः असे म्हणून पूजन करावे, कदाचित काही घरात काठी नसेल तर देवापुढे रांगोळीने किंवा कागदावर गुढीचे चित्र काढून सुद्धा पूजन करता येईल , हे पूजन करताना नवीन वर्षाचा संकल्प हा राष्ट्राच्या आणि विश्वाच्या आरोग्यासाठी मी स्वच्छतेचे , शिस्तीचे पालन करेन असा करावा आणि नवीन वर्ष सुखाचे जावो अशी ब्रह्मध्वजाला प्रार्थना करावी. असं सांगितलं आहे.