बातमी महिला विशेष विदेश

महाराष्ट्राचा ऑस्ट्रेलियात डंका, ठाण्याची श्रुतिका माने ठरली ‘मिस इंडिया ऑस्ट्रेलिया’

ठाण्यातील मराठमोळी श्रुतिका माने हीने वयाच्या अवघ्या 20 वर्षी, ऑस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या ‘मिस इंडिया सौंदर्य स्पर्धे’त विजेतेपद पटकावले आहे. श्रुतिका माने हिचा जन्म इंग्लडला झाला होता. त्यानंतर पुन्हा भारतात परतल्यावर ठाण्यातील सिंघानिया स्कूलमधून तिने पुढील शालेय शिक्षण पूर्ण केले. श्रुतिका सध्या ऑस्ट्रेलिया येथील एडलेड विद्यापीठातून ‘ऍडव्हान्स हेल्थ अँन्ड मेडिकल सायन्स’चे पदवी शिक्षण घेत आहे . येत्या ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईत होणाऱ्या मिस इंडिया जागतिक स्पर्धेसाठी श्रुतिका ऑस्ट्रेलियातर्फे प्रतिनिधित्व करणार आहे.

आपल्या यशाबद्दल श्रुतिकाने आपल्या भावना व्यक्त केल्या , ‘मिस इंडिया ऑस्ट्रेलिया’साठी माझी निवड झाली, ही माझ्या दृष्टीने आनंदाची व अभिमानाची बाब आहे. हा फक्त एक मुकुट नसून ,ती एक जबाबदारी आहे, ज्याची जाणीव मला आहे. भविष्यात आणखी काय करता येईल, याची उत्सुकता मला लागली आहे. महाराष्ट्रातील बंधू भगिनींचा पाठींबा मिळाला, त्यामुळे हे यश मी मिळवू शकले. जागतिक स्तरावर भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करणे, त्यांच्यातील सामर्थ्य व कलागुण जगासमोर आणणे, हा या स्पर्धेत भाग घेण्याचा उद्देश होता’, असे श्रुतिकाने सांगितले.

‘आपल्या अपत्याच्या यशाचा कायमच पालकांना आनंद होतो. भारतामध्ये टॅलेंटची कमतरता नाही. योग्य वेळी ,योग्य मार्गदर्शन मिळाले तर प्रत्येक घरातली मुलगी किंवा मुलगा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव पोहोचवू शकतो. आम्ही फक्त श्रुतिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो,’ अशा शब्दांत श्रुतिकाचे वडील आय.व्ही.एफ. तज्ज्ञ डॉ. संदीप माने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.श्रुतिका ठाण्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप माने आणि डॉ. राजश्री माने यांची कन्या आहे.

श्रुतिकाला अभिनयाची आवड आहे. कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले आहे तसेच अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये तिने बक्षिसं मिळवली आहेत , २००१ साली सिडनी-ऑस्ट्रेलिया येथे ऑस्ट्रेलियास्थित भारतीय राज सुरी यांनी मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या भारतीय तरुणींसाठी मिस इंडिया स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.कोविड १९ पार्श्वभूमीवर मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या सात स्पर्धकांची ऑनलाइन चाचणी परीक्षा व मुलाखत घेण्यात आली. राज सुरी यांनी या सौंदर्यस्पर्धेसाठी स्पर्धकांना मार्गदर्शन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *