तिरुचेंदूर चे मुरुगन मंदिर एक प्राचीन हिंदू मंदिर आहे, ज्याला भगवान मुरुगन म्हणजेच शिवपुत्र कार्तिकेय यांना समर्पित आहे. भारतातील तामिळनाडू येथे असलेल्या भगवानाच्या सहा निवासस्थानांपैकी हे तिसरे आहे. जयंतीपुरम हे त्या मंदिराचे ऐतिहासिक नाव आहे. हे तुतीकोरिन जिल्ह्यातील तिरुचेंदूर शहराच्या पूर्वेकडील भागात असून बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर या मंदिराचा परिसर आहे.
समुद्राच्या किनाऱ्याजवळ बांधलेले हे मंदिर उत्तरेकडून दक्षिणेस ९१ मीटर, पूर्वेकडून पश्चिमेस ६५ मी. लांबीचे असून या मंदिरास नऊ-स्तरीय गोपुर, जे १५७ फूट उंच आहे. मुख्य प्रवेशद्वाराचे दक्षिणेकडे तोंड आहे. मंदिराचे आतील गर्भगृह एका गुहेत आहे, आणि मुरुगन हे संत मूलाच्या रुपातील मुख्य देवता आहेत, ज्याला ग्रॅनाइटवर कोरण्यात आले आहे.
जवळजवळ २ सहस्रांहून अधिक काळ उभे असलेले हे मंदिर प्राचीन तामिळ स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार प्रथम मंदिर प्रहारमध्ये उघडते, ज्यास सिव्हली मंडपम देखील म्हटले जाते. सिव्हीली मंडपभव्यतेचा उत्कृष्ट प्रभाव तयार करते. वसंत मंडपम हे 120 स्तंभांवर उभे मुख्य मंदिरातील प्रवेशद्वारास सुशोभित करतात. हे एकमेव हिंदू मंदिर आहे ज्याचा दरवाजा पूर्वेला नाही. राजगोपुर पश्चिमेच्या प्रवेशद्वाराजवळ आहे. मंदिराच्या जवळपासच्या वास्तूंचे नुकसान झाले असले तरी, त्सुनामीतून जिवंत राहिल्यामुळे मंदिरातील वास्तूशैलीत गूढता आणि वैभवही वाढले आहे.
डिसेंबर 2004 मध्ये प्राणघातक अशा त्सुनामीच्या लाटांनी सर्व काही नष्ट करून या तिरुचेंदूर या छोट्याशा गावात भयंकर नुकसान केले. परंतु ती प्रचंड शक्ती अपयशी ठरली ती म्हणजे तिरुचेंदूर च्या मुरुगन मंदिरासमोर. या त्सुनामीच्या उंच लाटा या मंदिराला धक्का देखील देऊ शकल्या नाहीत. मंदिराच्या कंपाऊंडच्या भिंतीला देखील स्पर्श करण्याचे धाडस त्यांनी केले नाही. सर्वत्र गर्जणाऱ्या समुद्राची पराक्रमी शक्ती या पवित्र प्राचीन मंदिरासमोर कमकूवत झाली आणि माघारी परतली.
आता प्रश्न उरतो तो हा की असे का आणि कसे घडले? आता यामागची एक रंजक आख्यायिका येथे सांगितली जाते. ती अशी…
१७ व्या शतकाच्या सुरूवातीस, डच लोकांनी नुकत्याच भारतील काही भागांमध्ये आणि जवळपासच्या बेटांवर आपल्या वसाहती सुरू केल्या होत्या. त्यांनी आजच्या श्रीलंका आणि तामिळनाडूच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर राज्य केले. प्रत्येक राज्यकर्त्या शासकाप्रमाणे त्यांनी देखील असहाय लोकांची संपत्ती लुटली, मंदिरे देखील तोडली, तेथील बहुमोल संपत्ती सुध्दा लुटली. ही सगळी लूटलेली संपत्ती घेऊन ते समुद्रा मार्गेच आपल्या देशात ते पाठवत असत.
नेहमी सारखेच, एके दिवशी डचांनी तिरुचेंदूर चे मुरुगन मंदिर देखील लुटले आणि तेथील सर्व संपत्ती परत आपल्या देशात पाठविली. सर्व मौल्यवान संपत्ती आणि मुरुगन देवाची मुख्य मूर्ती देखील त्यांनी लुटली. ती घेऊन जाताना त्यांना समुद्राच्या भयानक वादळाने त्यांना गाठले. त्यातील एकाने त्यांना असे सांगितले की मुरुगन देवाचा कोप झाल्याने हे वादळ आले. त्यांचा राग गेल्या शिवाय वादळ थांबणार नाही आणि जहाजही पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून त्यांनी देवाची मूर्ती समुद्रात सोडली पाहिजे आणि भगवान सुब्रमण्यला प्रार्थना करायला पाहिजे. पण यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. त्यानी चक्रीवादळ पार करण्याचा खूप प्रयत्न केला पण काही तासांनंतरही त्यांना समुद्रातून एक इंच ही हलता येईना. बराच प्रयत्न करूनही जहाज त्याच ठिकाणी होते, त्यांनी बर्याच वेळा पुनरावृत्ती केली आणि प्रत्येक वेळी ते एक पाय देखील हलवू शकले नाहीत. मग त्यांनी ती मुरूगन म्हणजे सुब्रमण्य भगवानाची मूर्ती पाण्यात सोडली. व त्यानंतर त्यांना आपला प्रवास सुरू करता आला.
सुरक्षितपणे आपल्या देशात पोहोचल्यानंतर डच लोकांनी जे जे लोक भेटतील त्यांना ही गोष्ट कथन करुन सांगितली.
नंतर काही काळाने पिल्लई नावाच्या परमेश्वराच्या भक्ताच्या स्वप्नात भगवान मुरुगन आले व त्यांनी स्वतः आपण समुद्रात कोणत्या ठिकाणी असल्याचा इशारा दिला. ती जागा म्हणजे त्या डच सैनिकांनी मूर्ती फेकली ते ठिकाण. दुसऱ्याच दिवशी पिल्लई यांनी त्या जागी जाऊन देवाच्या मूर्तिचा शोध घेतला. स्वप्नात जेथे समुद्रात लिंबू तरंगताना त्यांना दिसले होते तेथेच देवाची मूर्ती त्यांना सापडली. त्यानंतर भगवान मुरुगन यांची मूर्ती मंदिरात पुन्हा स्थापित करण्यात आली.
दगडी पाट्यावर एक जुना शिलालेख असे म्हटले आहे की भगवान वरुणने भगवान कार्तिकेयाला वचन दिले होते की समुद्रामुळे मंदिराला कधीही कोणतीच हानी होणार नाही आणि तिरुचंदूरमध्ये भगवान वरुण भगवान मुरुगनांच्या समर्थनार्थ नेहमी उभे राहतील. आणि म्हणूनच स्थानिक कथे प्रमाणे वरूण देवांनी आपले वचन पाळले व त्सूनामी येऊनही समुद्राने मंदिरास काहीही केले नाही.