देश

जेनयू मध्ये झालेल्या हिंसाचाराची विद्यापीठ प्रशासनाने दिली माहिती

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) काल रात्री विद्यार्थ्यांवर अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात शिक्षक आणि सुमारे वीस विद्यार्थी जखमी झालेत. या सर्व हिंसाचारावर जेएनयू प्रशासनाने माहिती दिली आहे.

रजिस्ट्रेशनला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गोंधळ केल्याचे यात म्हटले आहे. जेएनयू कॅंपसमध्ये हिंसाचार होणं हे दु:खद असून कोणत्याही प्रकारच्या हिंसेची निंदा करत असल्याचे जेएनयूने म्हटले आहे.

वसतिगृहाची फी वाढविल्याविरोधात 8 ऑक्टोबरपासून विद्यापीठाच्या परिसरात छात्रसंघासोबत इतर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. निषेध म्हणून विद्यार्थ्यांनी सेमिस्ट परिक्षांवर बहिष्कार देखील टाकला होता.

डाव्या संघटनांनी दोन दिवस सर्व्हर रूमवर कब्जा केला होता. त्यांनी विद्यापीठातील रजिस्ट्रेशन प्रक्रिया बंद पाडली होती. पुढच्या सेमिस्टरचं रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख रविवारी असल्यानं काही विद्यार्थी रजिस्ट्रेशन करण्यासाठी गेले होते. तेव्हा डाव्या संघटनांनी त्यांना रोखलं आणि हुज्जत घातली. याच दरम्यान धक्काबुक्की आणि बाचाबाची झाल्यामुळे वातावरण थोडं तापलं. ही घटना घडत असताना काही शिक्षकही तिथे उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि हिंसाचार झाला. गेल्या काही दिवसांपासून जेएनयू मध्ये फी वाढी विरोधात आंदोलन सुरू आहे. त्यातच काल विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. आता त्याचे पडसाद संपूर्ण देशभर पाहायला मिळत आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटद्वारे या हल्ल्याचा निषेध केला आहे. जेएनयूमधील हिंसाचाराची माहिती ऐकून आपल्याला धक्का बसला. विद्यार्थ्यांवर क्रुरपणे हल्ला केला गेला आहे. पोलिसांनी तातडीने ही हिंसा थांबवावी आणि शांतता प्रस्थापित करावी. जर विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थी सुरक्षित नसतील, तर देशाचा विकास कसा होईल?, असा प्रश्न केजरीवील यांनी ट्विटद्वारे केला आहे.