देश

भारतातील ‘या’ शहरात केली जाते रावणाची पूजा

विजयादशमीला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय. परंतु आपल्या देशातील काही शहरांमध्ये आजच्या दिवशी रावणाची पूजा केली जाते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या शहरात रावणाची पूजा केली जाते.

रावणाची सासुरवाडी ही भारतातील मध्य प्रदेशातील मंदसौर ही आहे असे मानतात. रावणाची बायको मंदोदरी या नावावरून मंदसौर हे नाव मिळाल्याचे मंदसौरवासी सांगतात. त्यामुळे रावणाला समस्त मंदसौरवासी जावाई मानतात. त्यामुळे मंदसौरमध्ये दसऱ्याला रावणाचा पुतळा जाळला जात नाही. त्याऐवजी भला मोठा दसऱ्याचा मेळा या ठिकाणी आयोजित केला जातो.. म्हैसूरच्या राजवाडय़ातील शाही दसऱ्यानंतर मंदसौरचा दसरा हा अनेकांचं आकर्षण आहे..

उत्तर प्रदेशातील नोएडा क्षेत्रात बिसारख नावाचे एक गाव आहे. हे गाव रावणाचे जन्मस्थान मानले जाते. या गावात रावणाचे मंदिर आहे. या मंदिरात ४२ फूट उंच शिवलिंग आहे. तसेच ५.५ फूट उंच रावणाची मूर्ती आहे. या गावातील लोक रावणाला महाब्रम्ह असे म्हणतात. या गावात दसऱ्याची दिवशी रावणाचे दहन केले जात नाही, उलट रावण दहनाचा शोक व्यक्त केला जातो.

हिमाचल प्रदेशातील बैजनाथ येथील एका मंदिरात रावणाची पूजा केली जाते. पौराणिक कथांनुसार, रावण भगवान ब्रह्माचा नातू होता, तसेच तो कुबेरचा धाकटा भाऊ देखील होता. त्यामुळे एका विद्वान राजाला जाळणे योग्य नाही. अशी मान्यता येथील लोकांची आहे. म्हणून येथील लोक रावणाची पूजा करतात.