बातमी महाराष्ट्र

आरे’च्या मुद्द्यावर रोहितचं मेट्रो प्रशासनाला का रे..

मुंबईच्या आरे कॉलनीतील अनेक झाडे दोन दिवसांपूर्वी मेट्रो कारशेडसाठी तोडण्यात आली. त्यावरून बराच वादंग निर्माण झाला. त्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी करत वृक्षतोडीच्या कामाला २१ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली. या दरम्यान मुंबईतील आरे कॉलनीमध्ये मेट्रो कारशेडवरून सुरू असलेल्या वादात भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने उडी घेतली आहे.

जीवनात ज्या वस्तूंची नितांत आवश्यकता असते, अशा गोष्टी नष्ट करून कसं चालेल? मुंबईत हरितपट्टा तयार करण्यासाठी आणि वातावरण संतुलित ठेवण्यात ‘आरे’ने मोलाचा वाटा उचलला आहे. असा अत्यंत महत्वाचा असलेला मुंबईतील हरितपट्टा नष्ट करणं चुकीचे आहे. प्रशासनाच्या या कृतीमुळे वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे हे वेगळे नमूद करायची गरज नाही”, अशा शब्दात रोहितने मेट्रो प्रशासनाच्या कारवाईचा निषेध केला.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने आफ्रिकेवर २०३ धावांनी विजय मिळवला. रोहित या सामन्यात सामनावीर ठरला. रोहित शर्माने पहिल्या डावात २४४ चेंडूत १७६ धावांची धमाकेदार खेळी केली. पहिल्या डावात त्याने २३ चौकार आणि ६ षटकार लगावले. हीच लय कायम राखत त्याने दुसऱ्या सामन्यातदेखील शतक ठोकले. रोहितने दुसऱ्या डावात १४९ चेंडूत १२७ धावांची खेळी केली. या डावात रोहितने १० चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. त्यानुसार त्याने दोनही डावात मिळून ३०३ धावा केल्या.