बातमी

‘कौन बनेगा करोडपती’च्या नावाखाली तरुणाला 40 हजाराला लुटले

सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शो चांगलाच चर्चेत आहे. या शो ने तरुणांना भुरळ घातली आहे. हॉट सीटवर बसण्याची अनेक तरुणांची इच्छा आहे. आणि महानायक अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी देखील अनेक चाहते उत्सुक आहेत. मात्र या शो च्या नावाने भामटे फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये नुकताच एका तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. अरविंद मौर्य असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. अरविंद हा विद्यार्थी आहे. त्याने सांगितलेल्या माहितीनुसार एक दिवस त्याला फोन आला आणि सांगितले की ‘कौन बनेगा करोड़पति’ गेम शो मधून बोलतोय. तुम्हाला फोनवर काही प्रश्न विचारले जातील. त्याची उत्तरं मिळाली तर तुम्हाला 25 लाखांचे बक्षीस मिळेल. अरविंद त्यासाठी तयार झाला. नंतर त्याला काही प्रश्न विचारण्यात आले आणि थोड्या वेळाने त्याला फोन करून सांगण्यात आले की तो जिंकला असून त्याला 25 लाखांचे बक्षीस लागले आहे. हे  ऐकूण अरविंदला आनंद झाला. नंतर त्या फोन करणाऱ्या भामट्याने बक्षिसावरचा टॅक्स म्हणून त्याला 40 हजार रुपये भरण्यास सांगितले. अरविंदने कुठलाही विचार न करता दिलेल्या अकाऊंटवर पूर्ण पैसे भरले. नंतर त्याला आणखी पैशांची मागणी केली गेली तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी गुन्हा दाखल करत सायबर क्राइमकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सोपवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारचे कोणतेही कॉल आले तरी उचलू नका.