राजकारण

राज्यात 288 मतदारसंघात ‘किती’ उमेदवार रिेंगणात?

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात 288 मतदारसंघात 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आता एकूण 3 हजार 239 उमेदवार रिेंगणात आहेत. त्यांचे भवितव्य निकालाच्या दिवशी 24 ऑक्टोबरला समजेल.

राज्यात सर्वात जास्त 246 उमेदवार पुणे जिल्ह्यातून तर सर्वात कमी 23 उमेदवार सिंधुदूर्ग जिल्ह्यातून निवडणूक लढवणार आहेत. निवडणूक विभागाकडून ही माहिती देण्यात आली.
शनिवारी अर्ज छाननीअनंतर 4 हजार 743 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातून 1 हजार 504 उमेदवारांनी माघार घेतली. नंदुरबार जिल्ह्यात 4 मतदारसंघात 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. धुळे जिल्ह्यात 5 मतदारसंघात 38 उमेदवार, जळगाव जिल्ह्यात 11 मतदारसंघात 100 उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात 7 मतदारसंघात 59 उमेदवार, अकोला जिल्ह्यात 5 मतदारसंघात 68 उमेदवार, वाशिम जिल्ह्यात 3 मतदारसंघात 44 उमेदवार, अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघात 109 उमेदवार, वर्धा जिल्ह्यात 4 मतदारसंघात 47 उमेदवार, नागपूर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 146 उमेदवार, भंडारा जिल्ह्यात 3 मतदारसंघात 42 उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात 4 मतदारसंघात 47 उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 38 उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 71 उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात 7 मतदारसंघात 88 उमेदवार, नांदेड जिल्ह्यात 9 मतदारसंघात 135उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

येथे जास्त तेथे कमी उमेदवार
सर्वाधिक उमेदवार नांदेडला, सर्वात कमी चिपळूण मतदारसंघात आहेत. तिथे तीन उमेदवार आहेत. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नांदेड दक्षिण, बीड, औरंगाबाद पूर्व, जालना या चार मतदारसंघात 31 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने एका ईव्हीएमसाठी 3 बॅलेट युनिटची (बीयु) आवश्यकता राहणार असून कंट्रोल युनिट (सीयु) एकच लागणार आहे. .

असंही झालंय
नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदार संघात सर्वाधिक 91 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यामधून तब्बल 84 उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे केवळ 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.