राजकारण

कोरोनाला रोखण्यासाठी राज ठाकरेंनी केल्या ‘या’ सुचना

राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारनेही अनेक महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या फेसबुक पेजवरुन नागरिकांना आवाहन केले आहे. राज ठाकरे  यांनी  कोरोनाला रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत.

या फेसबुक पोस्ट मध्ये राज ठाकरेंनी म्हटले आहे की, आतापर्यंत आपण कोरोनाला जास्त फैलावू न देण्यात यशस्वी झालो आहोत. कोरोना एकमेकांच्या सहवासातून होतो. म्हणून आपण जर कमी वेळा एकमेकांच्या जवळ गेलो आणि हे सुमारे दोन आठवडे केलं तर हा रोग पसरणार नाही असे राज ठाकरेंनी सांगितलं आहे.

तुमच्या भागात जे कुणी सर्दी, तापानं आजारी असतील त्यांना धीर देऊन तपासणी करून घ्यायला सांगा. आपल्या भागात असे कुणी रूग्ण आढळल्यास प्रशासनाच्या किंवा आरोग्य खात्याच्या योग्य व्यक्तिंशी संपर्क राखून त्यांच्या देखरेखीखाली त्यांचे उपचार करावेत. सोशल मीडियाचा योग्य आणि कल्पक वापर करण्याची हीच ती वेळ आहे असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

कोरोनाच्या संकटाला कसं तोंड द्यायचं?माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो,आत्तापर्यंत आपण कोरोनाला जास्त फैलावू न देण्यात…

Posted by Raj Thackeray on Thursday, March 19, 2020

आपल्या भागात जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा असल्यास तशी माहिती योग्य यंत्रणेला द्यावी. दुकानांमध्ये माल आहे की नाही ते पहावे. कुणी काळाबाजार करत असेल तर त्याची माहिती शासनाला द्यावी आणि लक्ष ठेवावे.

ज्यांचं हातावर पोट आहे अशी माणसं आपल्या भागात असतील. ती कोण आहेत ती शोधून त्यांची खाण्याची सोय नसेल तर ती करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या भागात काही जेष्ठ नागरिक, अपंग, इतर रूग्ण असतील तर त्यांना काही मदत लागल्यास ती देण्याचा प्रयत्न करावा.

महिला सेनेनी घराघरात जाऊन महिलांच्या आरोग्यविषयक किंवा काही अडचणी असतील तर त्या ऐकाव्यात. महिला सर्वसाधारणपणे बोलत नाहीत. त्यांचं ऐकावं आणि योग्य ती मदत करावी.

सोशल मीडियाचा योग्य आणि कल्पक वापर करण्याची हीच ती वेळ. अफवा खोडून काढा. तुमच्या विभागातील नागरिकांशी संपर्कात राहा. शासकीय-प्रशासकीय यंत्रणेकडून येणारी योग्य माहिती जनतेपर्यंत इत्यंभूत पोहचेल ह्याची काळजी घ्या.