राजकारण

शरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील

” मला कोथरुडमध्ये अडकवून ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना साधा उमेदवार देता आला नाही त्यावरुन त्यांच्या पक्षांची ताकद किती उरली आहे ते कळून येतं” असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ” मी कोथरुडमधून निवडून येणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही” असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

विधानसभा निवडणुकीनंतर राजकारण आणि समाजकारण यातून शरद पवार यांना कायमची निवृत्ती देणार असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. कोल्हापुरात झालेल्या सभेत ते बोलत होते. राधानगरी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील राधानगरी तुरंबे या ठिकाणी आले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव ईडीने शिखर बँक घोटाळ्यात घेतले होते. ज्यानंतर शरद पवार यांनी स्वतःच ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन आणि ईडीने येऊ नका सांगितल्याने मी जाणार नाही असा निर्णय शरद पवार यांनी घेतला. त्यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांनी ईडीच्या प्रकरणाचा इव्हेंट केला अशी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावर शरद पवार यांना विचारलं असता ज्या माणसाने निवडणूकही लढवली नाही त्याच्याबद्दल काय बोलणार असा टोला लगावला होता.

दरम्यान आज चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात बोलताना शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांना राजकारणातून आणि समाजकारणातून कायमची विश्रांती देणार असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे आणि मी कोथरुडमध्ये निवडून येईन हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.