“झाले बहू , होतील बहू पण या सम हाच “
आज शिवजयंती. या मराठी रांगड्या मातीत जन्मलेल्या भूमीच्या लेकाचा आज जन्मदिन. छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंचा नायनाट करण्यासाठी व जनतेच्या कल्याणासाठी या भूतलावर जन्म घेतला व त्या मायमाऊली जिजाऊंचे मागणे सार्थकी लावले.
या दिवशी अवघा महाराष्ट्रच एका नव्या जोमात, उत्साहात असतो. या दिवसाच्या निमित्ताने महाराजांबद्दल लिहावे तेवढे थोडेच! पण या कुशल पराक्रमी योध्दाच्या जीवनात बऱ्याच लढाया आल्या त्या शिवरायांनी बेदिक्कत जिंकल्या. आपल्या पराक्रमाच्या जोरावर हे हिंदवी स्वराज्य उभं केलं. पण हे स्वराज्य उभारताना लढाया करून, मोठाले मूलूख जिंकून, संपत्ती मिळवून च फक्त चालणारं नव्हतं तर ज्या जनतेसाठी हे लाखमोलाच स्वराज्य उभं करण्यात येत आहे त्या जनतेकडे देखील पाहणं महत्वाच होतं. या सगळ्या स्वराज्याचा तसेच समाजाचा बोजवारा वाहणारा अन्नदाता असणारा आपला शेतकरी हा संपन्न असावा हे देखील महाराजांनी पाहिले. जनता सुखी तर राज्य सुखी आणि अन्नदाता शेतकरी संतुष्ट तर अख्ख स्वराज्य उन्नत होत हे महाराज जाणून होते. म्हणूनच त्यांनी आपल्या राज्यातील शेती व शेतकऱ्याकडे नेहमीच जातीनं लक्ष दिलं
शिवरायांच्या सर्वसमावेशक धोरणामुळे हातात गोफण घेऊन शेताची राखण करणारा शेतकरी कधी हातात ढाल तलवार घेऊन स्वराज्याचा धारकरी झाला हे त्याला देखील समजलं नाही.!
शिवाजी महाराजांच्या राज्य यंत्रणेत दोन प्रकारचे कर्मचारी होते – कायमस्वरुपी (permanent) आणि तात्पुरते (temporary). तेथे मोठ्या संख्येने अस्थियी (temporary) लोक होते, विशेषत: सैन्यात, बहुतेक सैनिक पावसाळ्याच्या चार महिन्यांपर्यंत शेती करीत असत आणि उर्वरित आठ महिने सैन्यात काम करत असत. पावसाळ्यात युद्ध शक्य नव्हती. नदी नाल्यांमधील रस्ता, वाहतुकीची उलाढाल व असुविधा यामुळे युध्द होत नसत. या शांती काळात युध्दाच्यावेळी लढव्यया असणारा हा मावळा आठ महिन्यांमध्ये शेती करायचा.
‘शेतकरी’ हा समाजाचा पाया असतो आणि तो भक्कम राहण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. शेती समृध्द असेल तर राज्यात लोकांना अन्न मुबलक मिळत. ज्या राज्याची शेती खूप सकस ते राज्य सर्वात जास्त संप्पन्न मानल जातं. शिवाजी महाराजांच्या याच धोरणामुळे स्वराज्यातील शेतकरी हा महत्वाचा घटक होता हे सिधद होते. समाजाला अन्न धान्य मुबलक मिळावं दुष्काळातही पुरेसा साठा राज्यात असावा यासाठी योग्य प्रकारे शेती केली जावी या कडे शिवरायांचा जास्त कल असत.
शांतिपर्वात स्वराज्याची सुव्यवस्थेची घडी कशी नीट बसेल या कडे महाराजांच काटेकोर लक्ष असायचं. या वेळेस ते स्वतः जातीने याकडे पहात. स्वराज्य निर्माण करता ना फक्त तलवारीची ताकद दाखवणे महत्त्वाचे नसते तर त्या राज्यच्या सामाजिक समस्यांशी देखील लढाई करून जिंकावे लागते. नुसतेच नवनवीन मुलुख जिंकत जाणारा राजा काय कामाचा जर त्याचे त्याच्या जनतेकडे देखील लक्ष नसेल. या सगळ्याचा तोटा होतो तो म्हणजे जनता राजा वर असंतुष्ट होते. राजा म्हणून सिंहासनावर बसताना जनतेची मायबापा प्रमाणे सांभाळ करेल अशी शपथ घेतलेला राजा आज त्याच्या मुलांसारख्या जनतेला वाऱ्यावर सोडत असेल तर त्या जिंकलेल्या लढाईचा त्या राजाला फायदा न होता जास्त तोटाच होण्याची शक्यता असते. याच साठी शिवाजी महाराजांनी शांतिपर्वात आणि लढाईच्या काळात देखील जनतेचा हात कधीच सोडला नाही.
सर्वांना समानता आणि चांगुलपणा यावर विश्वास ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज एक नीतिमान राजा होते. त्याची धोरणे, शिस्त आणि न्याय, प्रशासनाच्या सीमेमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य दर्शवितात.
शिवरायांच्या शेती विषयक धोरणांची नेहमीच खूप प्रशंसा होत आली आहे. शेतकरी हा आपला अन्नदाता असतो हे महाराजांनी नेहमीच लक्षात ठेवून शेती ची प्रगती कशी होईल या कडे लक्ष दिले. विशेष म्हणजे त्यांच्याकडे एवढ्या मोठा स्वराज्यातील प्रत्येक शेतकर्याची संपूर्ण नोंद असे. प्रत्येक शेतकऱ्याकडे कोणत्या प्रकारची माती उपलब्ध आहे, शेतकरी कोणत्या प्रकारचे पीक पेरत आहे, शेतकऱ्याकडे कोणत्या प्रकारचा सिंचन आहे हे सगळं महाराज पहात.
त्यांनी एक अद्वितीय कर आकारणी धोरण तयार केले होते. प्रत्येक गावचे देशपांडे, कुलकर्णी आणि पाटील असे तीन अधिकारी एकमताने कर रचनेची रचना तयार करीत असत आणि ते गोळा करीत असत. शिवाजी महाराजांच्या कराच्या धोरणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची लवचिकता. महाराज गरज, आर्थिक स्थिती आणि स्थानिक परंपरा पाहून कर वसूल करायचे. स्वराज्यात करांची सक्ती करून व बेकायदेशीर वसुली करण्यास सक्त मनाई होती.
बदलत्या काळाशी मिळतीजुळती त्यांची धोरणे पाहून शिवरायांच्या राज्य कौशल्याचे नेहमीच कौतुक वाटते. या धोरणांमुळेच महाराजांचे स्वराज्य प्रबल झाले. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांची स्वराज्याबद्दलची दृष्टी, त्यांची उद्दीष्टे आणि त्यांचे कार्य अंमलबजावणी हे आधुनिक काळाशी संलग्न आहे. त्याचप्रमाणे धोरण तयार करण्याच्या दृष्टीने त्यांची दूरदृष्टी त्याला संशोधनातून आणि सर्वेक्षणातून सहाय्य केलेल्या आजच्या धोरणकर्त्यांपेक्षा खूपच पुढे ठेवते.