क्रीडा

IND vs NZ: भारताला धक्का; दुसऱ्या सामन्याआधी स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर

भारतीय संघाला दुसऱ्या कसोटी सामन्याआधीच मोठा धक्का बसला आहे.  स्टार खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. भारतीय संघ 28 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळणार आहे.

भारतीय संघाच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी पहिल्या सामन्यात चाहत्यांची पार निराशा केली. त्यातच आता भारताचा अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा याला दुसऱ्या कसोटीला मुकावे लागणार आहे. क्रिकबझने हे वृत्त दिले आहे. उजव्या पायाच्या घोट्याच्या दुखापतीने उचल खाल्ल्यामुळे इशांत शर्माला दुसऱ्या कसोटीला मुकावे लागणार आहे.

जानेवारी महिन्यात विदर्भ संघाविरूद्धच्या देशांतर्गत सामन्यात त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो कसोटी मालिकेला मुकणार असे बोलले जात होते. पण पहिल्या कसोटी सामन्यात तो तंदुरूस्त असल्याने त्याला संघात स्थान मिळाले होते. इशांत शर्माने पहिल्या सामन्यात पहिल्याच डावात दमदार कामगिरी केली होती. त्याने ६८ धावांमध्ये न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद केला होता. पण दुसऱ्या सामन्यातून मात्र त्याला माघार घ्यावी लागली आहे. इशांतच्या जागी अंतिम ११ खेळाडूंच्या संघात उमेश यादवला संधी देण्यात येण्याची शक्यता आहे.