क्रीडा

‘बांग्लादेशी खेळाडूंचं सेलिब्रेशन किळसवाणं होतं’

भारतीय संघाचा पराभव करत बांग्लादेशने 19 वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेत पहिले विजेतेपद पटकाविले आहे. मात्र अंतिम सामन्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाली. बांगलादेशच्या खेळाडूंनी सामना जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंना धक्काबुक्की करत शिव्याही घातल्या.

बांगलादेशचे खेळाडू मैदानात आल्यानंतर दोन्ही टीममध्ये बाचाबाची झाली. बांगलादेशचे खेळाडू भारतीय खेळाडूंना काहीतरी म्हणाले. यानंतर अंपायरनी मध्यस्ती केली. मैदानावर कोणत्या खेळाडूने उचकवण्याचा प्रयत्न केला, याची माहिती मिळू शकलेली नाही. कॅमेरामध्येही या गोष्टींचं चित्रिकरण झालेलं नाही. आयसीसीकडून मात्र या प्रकारावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

भारतीय कर्णधार प्रियम गर्गने या प्रकारासाठी बांगलादेशला दोषी ठरवलं आहे. “आम्ही शांत होतो. हार-जीत हा खेळाचा एक भाग आहे, कधीतरी तुम्ही जिंकता तर कधीतरी तुम्ही हरता…मात्र बांगलादेशी खेळाडूंचं सेलिब्रेशन किळसवाणं होतं. हा प्रकार व्हायला नको होता, पण आता सगळं ठीक आहे.” Espncricinfo संकेतस्थळाशी प्रियम बोलत होता. सामन्यादरम्यानही बांगलादेशी खेळाडू आक्रमक पहायला मिळत होते.