इतर काम-धंदा देश ब्लॉग महाराष्ट्र महिला विशेष यशोगाथा

तिने ३ महिन्याच्या मुलाला घेऊन रस्त्यावर टेबल टाकून मसाले विकले, आणि आज उभा केला करोडोचा व्यवसाय..

ग्लोबल फॉर्च्युन मिशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि कौशल फूड प्रॉडक्ट्सच्या संस्थापक आणि संचालक असणाऱ्या केडी सुषमा यांचा जीवन प्रवास खुप प्रेरणादायी आहे.
शून्यातून संघर्ष करत यशस्वी होण्याचा मार्ग शोधून काढत असताना बऱ्याच अडचणी सुषमा यांना आल्या. पण कधीही न थांबता, स्वतःवर विश्वास ठेवत त्या पुढे जातच राहिल्या. आयुष्य जगण इतक सोप्प नसत, पण ते कशा पध्दतीने जगाव हे आपण ठरवायच असतं.

हेच लक्षात ठेऊन सुषमा यांनी चरेगाव या छोट्याशा गावातून सुरु केलेला हा प्रवास आज आपल्या स्वप्नापर्यंत त्यांनी न्हेवून ठेवला आहे. स्वतः काही तरी मोठं करून दाखवण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या सुषमा यांना लहान वयातच वडिलांना गमावावे लागले. तेव्हा पासून प्रवास सुरू झाला तो फक्त अडचणीं वर मात करण्याचा. स्वतःला काय हवय, आपल्यला जे स्वप्न साध्य करायचय त्याला कोणाचाच पाठिंबा नाहीये हे पाहून त्यांनी हार नाही मानली.

कोणी नसलं आपल्या सोबत तरी आपण स्वतःच स्वतःचा आधार बनण्याचा निश्चय त्यांनी केला. घरच्यांची नाराजी पत्करून सर्व शिक्षण पूर्ण केले. पण सुषमा यांच्या मनाविरूध्द त्यांचे लग्न होतेय हे पाहून त्यांनी त्यास ठाम नकार दिला. व पुढे स्वतःच्या पसंतीने आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तिशी विवाह केला. पण त्या ही नंतर त्यांचे स्वप्न काही मार्गी लागताना त्यांना दिसत नव्हते. म्हणून त्यांनी लग्नानंतर MBA करण्याचा निर्णय घेतला.

या शिक्षणाचा खर्च तसा फार असतो. मग यासाठी पैसे उभारण्याचा प्रश्न आला. त्यांनी कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण केले. MBA होऊन त्यांना चांगल्या पगाराची नौकरी लागली. यानंतर त्या तेथेच थांबल्या नाहीत. त्यांच्या मनातील काही तरी मोठ करून दाखवण्याची ज्योत काही विझेना. म्हणून ती ही नौकरी सोडून त्यांनी आपला स्वतःचा मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला. आपला मुलगा तीन महिन्याचा असताना घर चालवण्यासाठी रस्त्यावर टेबल टाकून मसाले विकले.

संधी तयार करायच्या असतात त्याची वाट बघायची नसते अस म्हणणाऱ्या सुषमा यांच्या बिझनेसची सुरुवात रस्त्यावर टेबले टाकून 10 रुपयांचे मसाले विकण्या पासून झाली खरी पण तिथेच न थांबता निर्धाराने प्रवास चालू ठेवला व आज एका यशस्वी व्यवसायाची संचालक होण्यापर्यंतची मजल त्यांनी मारली आणि आज स्वकष्टावर उभी केलेली ‘ग्लोबल फॉर्च्युन मिशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘कौशल फूड प्रॉडक्ट्स’ या कंपन्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवू बघतायेत. त्यांच 2019 च टार्गेट होत की संपूर्ण भारत भर कंपनीचा प्रसार करायचा हे स्वप्न आज सत्यात उतरल आहे. व भारताबाहेरही कंपनीचा व्यवसाय वाढत आहे.

यासगळ्या जीवनाच्या चढ उतारातून च आपणही काहीतरी करू शकतो याचा त्यांना विश्वास मिळाला. स्वप्न बघा ती पूर्ण करण्यासाठी स्वतः वर विश्वास ठेवा कुणा दुसऱ्यावर आपल्या स्वप्नपूर्ती साठी अवलंबून राहू नका,हे केडी सुषमा नेहमी सांगतात.

गावातून आलेल्या एका मुलीचा हा प्रवास इथपर्यंत पोहचू शकतो तर मग शहरात तसेच जगाच्या पाठीवर कुठेही राहून प्रत्येक जण आपले स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकतो असा विश्वास सुषमा यांना आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *