Untold Talkies मनोरंजन

कोरोनामुळं निधन झालेले ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर आहेत तरी कोण ? कसा सुरू झाला त्यांचा अभिनयप्रवास ?

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख तयार करणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं आज (मंगळवार, दि 20 एप्रिल) दुपारी 12.30 च्या सुमारास ठाण्यात निधन झालं. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि 3 मुलं असं कुटुंब आहे.

नांदलस्कर यांनी 40 नाटकं, 25 हून अधिक मराठी आणि हिंदी सिनेमा आणि 20 हून अधिक मालिकेत काम केलं होतं. महेश मांजरेकर यांच्या वास्तव सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहे. अनेक सिनेमातून त्यांनी प्रेक्षकांना हसवण्याचं काम केलं आहे. बोरीवलीत वास्तव्यास असणारे नांदलस्कर तब्येत बरी नसल्यानं ठाण्यात मुलाकडे रहात होते. ते कोण आहेत, कुठले आहेत त्यांचा अभिनय प्रवास कसा सुरू झाला याची खूप कमी लोकांना माहिती आहे. आज आपण याचबद्दल माहिती घेणार आहोत.

खारेपाटण तालुक्यातील शेजवली हे किशोर नांदलस्कर यांचं मूळ गाव होतं. मुंबईतच त्यांचा जन्म झाला. लॅमिंग्टन रस्ता, नागपाडा, घाटकोपर आणि इतर काही भागात त्यांचं लहानपण गेलं. वडिल खंडेराव यांच्याकडूनच त्यांना अभिनयाचा वारसा मिळाला होता. त्यांनी त्या काळात नाटकात स्त्री भूमिका साकारल्या होत्या. नंतर अभिनयाला रामराम ठोकत खंडेराव यांनी काही काळ ज्युपीटर गिरणीत नोकरी केली. तिथं ते आंतरगिरणी आणि कामगार नाट्यस्पर्धेत नाटक बसवायचे. त्या वातावरणातच नांदलस्कर लहानाचे मोठे झाले. त्यांनाही अभिनयाचं वेड लागलं होतं.

किशोर यांनीही एक दिवस वडिलांना सांगितलं की, मलाही नाटकात काम करायचं आहे. वडिलांनीही त्यांना होकार दिला. 1960-61 साली रंगभूमीवर सादर झालेल्या आमराई या नाटकात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. यात त्यांची खूप नगण्य भूमिका होती. बाप्पा अशी हाक फक्त त्यांना मारायची होती. विशेष म्हणजे ते जेव्हा स्टेजवर आले तेव्हा त्यांना घाम फुटला. एक शब्दही उच्चारता आला नव्हता. बाप्पा अशी हाक मारणंही त्यांना जमलं नाही. प्रेक्षकांनीही त्यांची खिल्ली उडवली. पण त्यांनी हा प्रसंग धडा म्हणून घेतला. नंतर ते अनुभवातून खूप काही शिकले.

मुंबई मराठी साहित्य संघ मध्ये सादर होणारी अनेक नाटकं, त्यातील कलाकारांचा अभिनय त्यांनी पाहिला. यातून ते शिकत गेले आणि आपल्या आतील अभिनेता त्यांनी घडवला. त्याच काळात कलाकिरण ही संस्था काढली. वसंत जाधव यांनी लिहिलेली छोटी छोटी नाटकं केली. काही वर्षे त्यांनी एका कंपनीत याच काळात नोकरीही केली. नाटक करणं मात्र सुरूच ठेवलं.

लोकनाट्य लेखक शरद निफाडकर यांच्या विठ्ठल फरारी, नथीतून मारला तीर, सुंदरा मनामध्ये भरली ही नाटकं त्यांनी केली. 1980 मध्ये दूरदर्शनच्या गजरा, नाटक आणि इतर कार्यक्रमात ते सहभागी झाले. यातून हळूहळू त्यांचं नाव झालं आणि लोक त्यांना ओळखायला लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *