इतिहास

8 मार्च रोजीच का साजरा होतो महिला दिन?

4.29Kviews

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली.

अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला.या ठरावानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले. त्यानंतर पुढे जगभरात ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा​ होऊ लागला.

१९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले.

Leave a Response