राजकारण विदेश

म्यानमार मध्ये आणीबाणी लागू ,भारताने व्यक्त केली चिंता तर अमेरिकेने दिली धमकी .

म्यानमार मध्ये लष्कराने बंड करत तेथील सत्ता ताब्यात घेतली आहे आणि एका वर्षासाठी आणीबाणी घोषित केली आहे. माजी जनरल आणि उपराष्ट्रपती मिंट स्वे यांना कार्यकारी राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांना लष्कर प्रमुखाचा दर्जाही देण्यात आला आहे. तसेच लष्कराने तेथील नेत्या आंग सान सु की यांना अटक केली आहे. लष्कराने सत्ता तर ताब्यात घेतली होणाऱ्या विरोधाला सामोरे जाण्यासाठी रस्त्यांवर सैन्य तुकड्या तैनात केल्या आहेत. तसेच तेथील इंटरनेट सेवा आणि फोन लाईन बंद ठेवण्यात आले आहेत.

स्थानिक एनएलडी चे प्रवक्ते मयो न्यूट यांनी सांगितले की, आंग सान सू की आणि पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांना लष्कराने सोमवारी सकाळी छापेमारी करून अटक केली आहे. आपल्यालादेखील लवकरच अटक करतील अशी भीती मयो यांनी व्यक्त केली. म्यानमार मध्ये झालेल्या निवडणुकीत आंग सू की यांच्या एनएलडी या पक्षाला बहुमत मिळाले होते. पुढील कार्यकारिणीची म्यानमारमध्ये संसदेची बैठक होणार होती.

लष्कराने एनएलडी या पक्षावर, मतं मिळवण्यासाठी अफरातफर केल्याचा आरोप लावला आहे. निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराच्या तक्रारीवर कारवाई न झाल्यास लष्कर कारवाई करेल असा इशारा संसदेच्या नव्या सत्रापूर्वीच देण्यात आला होता. संविधानाचे पालन न केल्यास आम्ही संविधाच मागे घेऊ अशी सरळ धमकीच त्यांनी दिली आहे. बऱ्याच दिवसांपासून तिथे राजकीय ताणतणावाचे वातावरण होते. सत्तापालट होण्याच्या शंका देखील व्यक्त केल्या जात होत्या आणि त्या खऱ्या ठरल्या. लष्कराने एकहाती सत्ता हाती घेत या सर्व शंका आणि चर्चेला पूर्णविराम दिला.

याअगोदरही म्यानमारमध्ये १९६२ मध्ये लष्कराने सत्ता हाती घेतली होती. त्यानंतर ४९ वर्ष लष्कराचे नियंत्रण होते. परंतु आत्ताच्या म्यानमारमध्ये लष्कराच्या बंडाचे जागतिक पातळीवर पडसाद तीव्र पडसाद उमटले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ”आम्ही कायद्याच्या राज्यावर विश्वास ठेवतो. म्यानमार मधील लोकशाही टिकली पाहिजे” अशी भूमिका व्यक्त केली आहे. कायद्याचा सन्मान करा आणि कायदेशीर मार्गाने वादावर तोडगा काढा असे आवाहन ऑस्ट्रेलियाने म्यानमारच्या लष्कराला केले आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या नेत्यांची सुटका करण्याची मागणी केली आहे.

अमेरिकेने मात्र धमकीवजा चिंता व्यक्त केली आहे. म्यानमारच्या सैन्याने देशातील लोकशाही प्रक्रियेला खिळखिळे करून ठेवले आहे, आंग सान सू यांना अटक करणे हे अत्यंत गंभीर घटना आहे. अमेरिका म्यानमारमधील लोकशाहीवादी शक्तिंना पाठिंबा देत असून अटक करण्यात आलेल्यांची सुटका करावी अशी मागणी अमेरिकेने केली आहे. म्यानमारमधील लष्कराने आज केलेली कारवाई मागे न घेतल्यास अमेरिका कठोर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *