अर्थशास्त्र म्हणजे काय व्याख्या?www.marathihelp.com

अर्थशास्त्र म्हणजे काय व्याख्या?

अर्थशास्त्र : मानवाला उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनसंपत्तीचा उपयोग करून मानवाच्या असंख्य गरजांची शक्य तितकी अधिक पूर्ती कशी करावी, याचा विचार करणारे शास्त्र अर्थशास्त्र हे होय. अर्थशास्त्राच्या विकासाच्या प्रारंभीच्या काळात लोकांचे उपजीविकेचे दैनंदिन व्यवहार कसे चालतात, राष्ट्राची संपत्ती कशी वाढविता येईल, यांसारख्या प्रश्नांचे विवेचन करणे हे अर्थशास्त्राचे कार्य आहे, असे ढोबळपणे समजले जात असे. या सर्व प्रश्नांच्या मागे असणारी मूलभूत समस्या स्पष्ट करण्याचे श्रेय प्रा.रॉबिन्स यांचे आहे. ‘मानवाच्या अमर्याद गरजा व त्या भागविण्यासाठी उपलब्ध असलेली (पर्यायी उपयोगाची शक्यता असलेली) मर्यादित साधनसामग्री, यांचा मेळ घालण्याच्या उद्देशाने होणाऱ्या मानवी व्यवहाराचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय’, ह्या प्रा. रॉबिन्स यांनी केलेल्या व्याख्येमुळे अर्थशास्त्रविषयक विचारांत अधिक सूक्ष्मता आली.


अर्थशास्त्राच्या विकासाची पार्श्वभूमी

आपल्यापुढे उभ्या असणाऱ्‍या प्रत्येक व्यावहारिक प्रश्नाचे उत्तर मानव शोधत असतो. अगदी सुरुवातीचे प्रश्नही गुंतागुंतीचे नसतात व त्यांची उत्तरेही तशी फार मोठी बिकट नसतात. त्या काळात अशा उत्तरांचा कोणी ‘शास्त्र’ अशा पदवीने गौरव करीत नाही. परंतु प्रश्न जसजसे अधिक गुंतागुंतीचे होऊ लागतात, तसतसा त्यांचा अधिक मूलगामी विचार करावा लागतो. विविध उत्तरांचा परस्पर मेळ बसतो, की नाही हे पाहावे लागते व अशा विकसित होत जाणाऱ्‍या व्यवस्थेतून त्या त्या विषयाचे शास्त्र तयार होत जाते.

साहजिकच, मानवी संस्कृतीच्या सुरुवातीच्या कालखंडात ज्या वेळी आर्थिक व्यवहार सरळ आणि ढोबळ असे होते, त्या वेळी अर्थशास्त्रही अगदीच प्राथमिक अवस्थेत होते. मुख्य उत्पादन हे शेतीचे असे; वस्तुविनिमय बहुतेक वस्तूंच्या प्रत्यक्ष अदलाबदलीने होत असे; विविध वेतनमूल्ये ही सामाजिक परंपरेने व रूढीने ठरलेली असत; अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापार हा मर्यादित स्वरूपातच चालत असे; आर्थिक जीवनाचा मुख्य घटक कुटुंब असे. अशा काळात आर्थिक प्रश्नाच्या शास्त्रीय अभ्यासाची विशेष निकड न वाटणे साहजिक होते.

पाश्चिमात्य अर्थशास्त्राचा उगमही असाच ग्रीसच्या भूमीपर्यंत शोधता येतो. किंबहुना अर्थशास्त्राला गेल्या शतकाच्या अखेरीपर्यंत इंग्रजीत असणारे ‘पोलिटिकल इकॉनॉमी’ हे नामाभिधान प्राचीन ग्रीक लोकांच्या काळातील या शास्त्राच्या स्वरूपाचे निदर्शक होते. कुटुंबाहून मोठी असणारी संघटना ही ग्रीस देशात नगरराज्याची होती. ‘Oikonomos’ हा ग्रीक शब्द सर्वसामान्यपणे ‘कुटुंब’ अशा आशयाचा निदर्शक आहे. त्याचप्रमाणे ग्रीसमधील नगरराज्यांना ‘Polis’ अशी संज्ञा होती. ‘पोलिटिकल इकॉनॉमी’ हे, या दृष्टीने, एखाद्या कुटुंबाच्या अर्थव्यवहाराचा विचार करावा त्याप्रमाणे नगरराज्यांच्या अर्थव्यवहारांचा विचार करणारे ‘राजकीय अर्थव्यवहाराचे शास्त्र’ होते.

ग्रीक नगरराज्ये मागे पडली, रोमन साम्राज्याचा उदय झाला, ख्रिश्चन धर्माचा यूरोप खंडात सार्वत्रिक प्रसार झाला, परंतु या अनेक शतकांच्या काळात समाजाची मुख्य आर्थिक बैठक फारशी बदलली नाही. ती बैठक सरंजामशाही अर्थव्यवस्थेची होती. शेती हेच राष्ट्राचे मुख्य उत्पादन होते. जमीन ही सरदार-जमीनदार यांच्या मालकीची होती. कुळे व भूदास त्या जमिनीची कसणूक करीत होते. व्यक्तीचे समाजातील स्थान, प्रतिष्ठा, तिचे अधिकार, तिचे जीवनमान या गोष्टी या समाजरचनेत परंपरेने दृढमूल झालेल्या होत्या. या व्यवस्थेत अन्याय होता, परंतु तो स्थिरपद झालेला होता. दररोज विचार करावयास लावणारे नवनवीन गुंतागुंतीचे प्रश्न त्या अर्थव्यवस्थेत निर्माण होण्याचे कारण नव्हते.

पंधराव्या शतकानंतर ही परिस्थिती बदलत गेली व अठराव्या शतकापासून तर ती फारच झपाट्याने बदलू लागली. पंधराव्या, सोळाव्या व सतराव्या शतकांत अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापारात झपाट्याने वाढ होत गेली व ज्या परिवर्तनाला व्यापारी क्रांती म्हणून संबोधले जाते, ती क्रांती घडून आली. यानंतरच्या काळात नवीन यंत्रांचा शोध लागला. उत्पादनतंत्रात झपाट्याने बदल होत गेला व जिला औद्योगिक क्रांती म्हणून ओळखले जाते, ती क्रांती घडून आली. व्यापारी क्रांतीच्या काळात अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला. वस्तुविनिमयासाठी चलनाचा अधिक प्रमाणात वापर होऊ लागला. धनिक व्यापारी वर्ग निर्माण झाला व त्याने सरंजामदार वर्गाच्या सत्तेला शह देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:09 ( 1 year ago) 5 Answer 4611 +22